टिचभर पोटासाठी मैलोन्मैल पायपीट
By admin | Published: October 25, 2015 10:48 PM2015-10-25T22:48:26+5:302015-10-25T23:32:06+5:30
मेरुलिंगमधील वृद्धांची परवड : दुर्मिळ रानमेव्याच्या विक्रीसाठी कसरत
सायगाव : साठीनंतरचं वय हे खरंतर निवृत्तीचं. निवांत पेन्शन घेऊन नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवत विश्राम करण्याचा हा कालावधी. आयुष्याच्या या उत्तरायणातही ज्यांच्या पोटातली भुकेची आग तप्त असते. त्यांच्यासाठी साठी हा फार तर एक टप्पा असतो. चढणीला खरी सुरुवात येथून होते. शरीर साथ देत नसतं आणि पोट या वयात कुठं-कुठं नेत असतं. वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरीतही रानोमाळ भटकून चिचुर्डीसारख्या वनौषधींची विक्री करण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या वृद्धांची ही आहे दर्दभरी व्यथा.
मेरुलिंग हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, या डोंगरदऱ्यात वास्तव्य करून असणारा बहुतेक धनगर समाज अनेक संकटांना तोंड देत हलाखीचे जीवन जगत आहे. उपजीविकेसाठी मुंबईला स्थलांतरित झालेले स्थानिक माथाडीमध्ये मजुरी करतात. गावाकडं असणारे वृद्ध अशावेळी पशुपालन आणि शेतमजुरीत स्वत:ला गुंतवून घेतात; मात्र यातून पोट भरत नसल्यामुळे हंगामी रानमेवा विकून आपली गुजराण करतात. करवंद, जांभूळ, कडीपत्ता आणि चिचुर्डीसारख्या वनौषधींची विक्री करतात.
सध्या चिचुर्डीचा हंगाम आहे. सत्तरी-पंचाहत्तरी ओलांडलेले वृद्ध हाळ्या मारून आपल्या वनौषधीची विक्री करीत आहेत. त्यासाठी रोज सोळा ते वीस किलोमीटर पायपीट करीत आहेत. मेरुलिंगचा सरळसोट डोंगर उतरून पंचक्रोशीतील गावांमध्ये हे रानमेवा विकतात.
त्यासाठी त्यांना आदल्यादिवशी डोंगर पालथा घालून काट्याकुट्यातून चिचुरटे गोळा करावे लागते. जंगली श्वापदे आणि सापांचा कायम धोका असतो आणि एवढे करूनही केवळ ६० ते १०० रुपये मिळत असल्याने उपजीविकेचा हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. (वार्ताहर)
वयाच्या ६५ व्या वर्षीही वालाबाई हिरवे या आजी लटपटत्या शरीराने एकेक पाय उचलत खांद्यावर वनौषधीची पिशवी घेऊन दारोदार फिरत आहेत. मुलगा मुंबईला कष्टमय आयुष्य जगत आहे. घरी आजारी पती. वालाबार्इंना आॅपरेशन झाल्यामुळे रक्त बदलावे लागते. शरीरात पाणी होऊन सर्वांग लटपटू लागले. याही अवस्थेत पोट भरणे भाग आहे, त्यामुळे त्या आठवड्याला गावोगाव फिरून चिचुर्डी विकून उपजीविका करीत आहेत. या आजींसारखे कितीतरी वृद्ध आज या विक्रीवर जीवन कंठत आहेत; पण काही केल्या पोट भरत नाही. टिचभर पोटासाठी मैलोन्मैल पायपीट कधी संपणार, याचे कुणाकडेच उत्तर नाही.
चिचुर्डीचे औषधी गुण
चिचुर्डी हे एक स्थानिक फळ आहे. याचा आकार छोट्या बोराएवढा असून, चव अत्यंत कडवट असते. पित्त आणि मधुमेहावर हे अत्यंत गुणकारी असून, हे बाजारपेठेत कोठेही मिळत नाही. शंभर ग्रॅमला दहा रुपये एवढी माफक किंमत असूनही याला अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे काहीकाळाने हा रानमेवा नामशेष होण्याची शक्यता आहे.