महापुरामुळे मालदन शाळेचे ६५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:58+5:302021-08-02T04:14:58+5:30
ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील वांग नदीकाठी असलेल्या माध्यमिक शाळेची इमारत पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाली. तर दुसऱ्या ईमारतीमध्ये ...
ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील वांग नदीकाठी असलेल्या माध्यमिक शाळेची इमारत पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाली. तर दुसऱ्या ईमारतीमध्ये असलेले साठ वर्षांपूर्वीचे जुने दप्तर आणि साहित्याचे सुमारे ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. दुर्घटनेमुळे आता इमारतीच्या उभारणीबरोबरच शाळेतील साहित्य आणि रेकॉर्ड उपलब्ध करण्याचे आव्हान व्यवस्थापनासमोर ठाकले आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल हे माध्यमिक विद्यालय मालदन येथे वांग नदीकाठी ६० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहे. या विभागात २३ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत हाहाकार माजवला. यामुळे विभागात मोठे नुकसान झाले. मालदन येथील या माध्यमिक विद्यालयाची एक इमारत जमीनदोस्त झाली तर दुसऱ्या इमारतीमधील शालोपयोगी साहित्य खराब झाले.
महसूल विभागाने याचा पंचनामा केला. त्यामध्ये संगणक दहा लाख सतरा हजार, ग्रंथालय ३६०० पुस्तके व साहित्य चार लाख तीन हजार, प्रयोगशाळा साहित्य पाच लाख ७७ हजार, कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण खोल्यांचे ३० लाख ९६ हजार, पोषण आहार खोली व स्वच्छतागृहे ५० हजार रुपये, टेबल खुर्च्या व वीज साहित्यांचे ४ लाख असे ६४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी बी. आर. पाटील यांनी केला.
यावेळी सरपंच भीमराव गायकवाड, उपसरपंच संदीप पाटील, ग्रामसेवक अनिल जाधव, मुख्याध्यापक एस. पी. तोडसाम, आबासाहेब काळे उपस्थिती होती.
आता संस्थेनेही पुढाकार घ्यावा..
आतापर्यंत स्थानिक ग्रामस्थ आणि लोकसहभागातून या शाळेसाठी मदत करण्यात आली होती. आताही या अडचणीच्या काळात माजी विद्यार्थी यांनी आपापल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर शाळेसाठी मदतीचे आवाहन केले आहे. मात्र खूपच मोठे नुकसान झाल्याने संस्थेने मोठी जबाबदारी उचलण्याची गरज आहे. तरच येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल.
जुने रेकॉर्ड कसे मिळणार
साठ वर्षांपूर्वीचे संपूर्ण रेकॉर्डच भिजल्याने आणि तशी माहिती इतरत्र उपलब्ध नसल्याने ते पुन्हा मिळविण्याचे आव्हानच व्यवस्थापनासमोर आहे. तसेच शाळेतील इतर साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करताना मोठी अडचण असल्याचे ही सांगण्यात आले.
फोटो ओळी
पाटण तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मालदन येथील शाळेची इमारत पाण्यात होती. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. (छाया : रवींद्र माने)