मालदनचा युवक शेतीत करतोय करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:00+5:302021-05-06T04:42:00+5:30

तळमावले : मालदन (ता. पाटण) येथील विजय काळे हा युवक शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे. स्वत:च्या शेतीमध्ये ...

Maldan's youth is pursuing a career in agriculture | मालदनचा युवक शेतीत करतोय करिअर

मालदनचा युवक शेतीत करतोय करिअर

Next

तळमावले : मालदन (ता. पाटण) येथील विजय काळे हा युवक शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे. स्वत:च्या शेतीमध्ये त्याने वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी उत्तम पर्याय म्हणून गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. मोठ्या प्रमाणात गांडूळ खतनिर्मिती, आणि सेंद्रीय शेतीमधून मसाले गूळ निर्मिती करुन तो वार्षिक सुमारे पाच लाख रुपये कमवत आहे.

निसर्गाची आणि शेतीची आवड असलेल्या विजय काळे याने शालेय शिक्षणानंतर त्याच दृष्टिकोनातून आपले पुढील शिक्षण घेतले. बी.एस्सी अ‍ॅग्री झाल्यानंतर शेतीला पूरक असणारे कोर्स त्याने पूर्ण केले आहेत. या ज्ञानाचा व्यावसायिक जीवनात उपयोग करण्यासाठी त्याने गांडूळ खतनिर्मिती सुरू केली आहे तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना मार्गदर्शन देखील करत आहे. शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, रासायनिक खते न टाकता उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मी या क्षे़त्रात उतरलो असल्याचे विजय काळे सांगतो.

विजय वार्षिक ११० टन सेंद्रीय खतांची निर्मिती करत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे तसेच टॉनिक म्हणून फवारणीसाठी साधारणपणे ७ ते ८ हजार लिटर व्हर्मी वॉश तो तयार करतो. कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क सुमारे १ हजार २०० लीटर तयार करतो. सेंद्रीय मसाले गूळ वार्षिक २ हजार २०० किलो तयार होत असतो. त्यामधून त्याला सध्या गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रीय टॉनिक, दशपर्णी अर्क, कीटकनाशक, सेंद्रीय मसाले गूळ, अ‍ॅग्रो कन्सल्टींग आदीमधून सर्व खर्चवजा जाता वार्षिक ४ ते ५ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

- चौकट

केमिकलमुक्त गुळाची वैशिष्ट्ये

क्षारमुक्त पाणी असल्याने अप्रतिम चव, रसायनमुक्त जमीन, त्यामुळे इतर गुळांपेक्षा गुणकारी औषधी, रासायनिक भेंडी पावडरऐवजी देशी भेंडी, बाजारातील तेलाऐवजी देशी गाईचे तूप, गूळ चवदार, सुगंधी होण्यासाठी वेलची व सुंठ पावडरचा वापर विजय करतो.

- कोट

जमिनीचा पोत राखण्यासाठी प्रयत्न करणे, गांडूळ खत मोठ्या प्रमाणात निर्यात करणे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे माझे भविष्यातील नियोजन आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत शेतीत यशस्वी होता येऊ शकते तसेच कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी असल्याने तरुणांचीदेखील एक करिअर म्हणून याकडे वळण्यास हरकत नाही.

- विजय काळे, मालदन

फोटो : ०५केआरडी०१

कॅप्शन : मालदन (ता. पाटण) येथील विजय काळे या युवकाने गांडूळ खत प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाला अनेक अधिकारी, शेतकरी भेट देत आहेत.

Web Title: Maldan's youth is pursuing a career in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.