मलकापूर बनतेय ‘सोलर सिटी’

By admin | Published: February 13, 2015 12:06 AM2015-02-13T00:06:26+5:302015-02-13T00:51:07+5:30

दोनशे मिळकतधारकांनी उपकरणे बसविली : आणखी चार हजार उपकरणे बसविण्याचे उद्दिष्ट; इंधनात बचत, घरपट्टीतही सूट

Malkapur becomes 'Solar City' | मलकापूर बनतेय ‘सोलर सिटी’

मलकापूर बनतेय ‘सोलर सिटी’

Next

मलकापूर : सोलरसिटी अंतर्गत शहरामध्ये पहिल्या टप्प्यात २०० मिळकतदारांनी सोलर उपकरणे बसवल्याने इंधनात पन्नास टक्क्यांने बचत होत असल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात किमान चार हजार मिळकतदारांना सोलर उपकरणे बसविण्याचे उद्दिष्ट नगरपंचायतीने ठरवले आहे. या योजनेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मिळकतदाराला घरपट्टीत दहा टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरपंयाचतीने घेतला आहे.
मलकापूर शहराने गेली सहा वर्षांत पाणी योजनेबरोबरच लक्षाधिश कन्यारत्न योजना, कन्या सुरक्षा अभियान, गरोदर माता दत्तक योजना, सांडपाणी प्रक्रिया योजना यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वी करून मलकापूरचे नाव देशात उंचावले आहे. त्याच पद्धतीने सोलरसिटी या योजनेअंतर्गत घरोघरी सोलर वापराचे उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २०० मिळकतदारांनी या योजनेअंतर्गत सोलर उपकरणे घेतली आहेत. ही सोलर उपकरणे वापरल्यामुळे घरगुती गॅसच्या वापरात ५० टक्के बचत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर विजेवर पाणी गरम करणाऱ्या ग्राहकांची प्रतिदिन एक ते दोन युनीट विजेची बचत होत असल्याचेही दिसून आले आहे. अपारंपरिक ऊर्जा पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात जास्त फायदेशीर आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे.
हे ओळखून नगरपंचायत प्रशासनाने मलकापुरातील नागरिकांना सुधारित योजनेअंतर्गत अनेक फायदे देण्याचे जाहीर केले आहे. सुधारित योजनेनुसार किमतीच्या १५ टक्के नागरिकांचा स्वनिधी भरून उपकरणे बसवायची आहेत. १५ टक्के किंवा ३ हजार ३७५ पर्यंत नगरपंचायत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कमेचा माफक व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोलर वॉटर हिटर कार्यान्वित केल्यानंतर केंद्रीय नवीन व नवीकरण मंत्रालयाकडून नाबार्डद्वारा दहा टक्के किंवा २ हजार २५० रुपये नगरपंचायत विशेष अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय मलकापूर सोलरसिटी योजनेत सहभाग घेतल्याबद्दल घरपट्टीत दहा टक्के सूट देण्याचीही घोषणा नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)


पथदर्शी प्रकल्प
शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच इंधन व वीज बचतीमुळे आर्थिक फायदाही होत आहे. त्याचबरोबर देशासह जगात प्रयत्न सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन उपक्रमासही सोलर वापरामुळे काही प्रमाणात हातभार लागणार आहे. त्या दृष्टीने मलकापूर सोलर सिटी प्रकल्प एक पथदर्शी प्रकल्प बनू शकतो.
सोलर उपकरणे बसविण्यासाठी मलकापुरातील नागरिकांना ही एक सुवर्णसंधी आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरात ही उपकरणे बसविणार असल्यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात ही उपकरणे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नगरपंचायतीस नाबार्डसारखे अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे नागरिंकांना ही चांगली संधी आहे.
- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी

Web Title: Malkapur becomes 'Solar City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.