मलकापूरच्या मुलींनाच मिळेना बस !
By Admin | Published: September 1, 2015 08:17 PM2015-09-01T20:17:27+5:302015-09-01T20:17:27+5:30
युवती हतबल : ‘स्पेशल बस’च्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा; उपाययोजनेची मागणी
मलकापूर : मलकापूरच्या मुलींसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात आली. या योजनेचा राज्यभर आदर्श घेवून अनेक ठिकाणी महिलांच्या स्वतंत्र बस सुरू झाल्या. सध्या मात्र बस फेऱ्यांच्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा झाल्यान विद्यानगरहून परतताना मलकापूरच्या मुलींनाच बस मिळेना झाली आहे. दरम्यान बसवेळेत न मिळाल्याने शेकडो मुलींना तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे किंवा रिक्षासाठी पैसे मोजावे लागत आहे. या कोल्मडलेल्या वेळापत्रकाचा हजारो मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मलकापूर नगरपंचायतीने मुलींना मोफत पास व स्वतंत्र बससेवा सुरू केली. ही बससेवा दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे. १ हजारपेक्षा जास्त मुलींना मोफत बसपासचे वाटपही करण्यात आले आहे. या आदर्श योजनेचा राज्यभर गवगवाही झाला मुलींच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने पे्रमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान नगरपंचायतीने सातत्याने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी नगरपंचायत लाखो रूपये खर्चही करते. प्रत्यक्षात मात्र कन्यासुरक्षा अभियानात अनेक अडचणी आहेत. त्या शोधणे गरजेचे आहे. मलकापूर ते विद्यानगर मधील शास्त्र महाविद्यालय, महिला उद्योग ते शास्त्र महाविद्यालय या दोन मार्गाने या योजनेच्या बस धावतात. मलकापूरातील विविध विभागातून सुमारे १ हजारापेक्षा जास्त मुली कऱ्हाड व विद्यानगर येथे शिक्षणासाठी जातात. विविध महाविद्यालयांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळापत्रकानुसार बसफेऱ्या असणे गरजेचे आहे. विद्यार्थीसंख्या विचारात घेता व मुलींचे प्रमाण विचारात घेता, सध्या बसफेऱ्या अपूऱ्या पडताना दिसत आहेत. अनेक विद्यार्थीनींना बसस्टँडपर्यंत पायपीट करावी लागत आहे. तासन-तास थांबून शेवटी पास असूनही
रिक्षाला पैसे देवून प्रवास करावा लागत आहे. मलकापूर व महिलाउद्योग या बसेस शास्त्र महाविद्यालय, वेणूताई चव्हाण कॉलेज व अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातच फुल्ल होत आहेत. त्यामुळे गाडगे महाराज महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो मुलींना बसच मिळत नाही. चुकून एखाद्यावेळी रिकामी बस आल्यास सर्वच मुली एकाच बसला रांगा लावतात. शेवटी बस फुल्ल झाली की, रांगेतील मलकापूरच्या मुलींना बसच मिळत नाही नंतरच्या फेरीला बस मिळेल या आशेने तासन्तास रांगेत उभे राहूनही अनेकवेळा बस परत येतच नाही. याचा त्रास मुलींना सहन करावा लागत आहे.
बस वेळेत न आल्याने व अनेकवेळा बस मिळत नसल्यामुळे महाविद्यालय सुटण्याच्या तसेच भरण्याच्या वेळेत महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारात रिक्षा व्यवसायीकांची चांगलीच गर्दी होत आहे. बसची वाट बघण्यापेक्षा अनेक विद्यार्थी रिक्षानेच प्रवास करतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायीकांची चांगलीच चलती आहे. (प्रतिनिधी)
महिला उद्योग ते कॉलेज बस वेळेत येत नाही. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर मधून जाणाऱ्या सुमारे ३० ते ४० मुली आहेत. साडे सहाच्या बसला गेलो असता ही बस लवकर तरी गेलेली असते किंवा साडेसात वाजले तरी येत नाही. त्यामुळे रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नाही. अनेकवेळा कॉलेजवरून ही बस स्टँडपर्यंतच यते व इतर गावाला जाते. आगाशिवनगरला जाणाऱ्या ३० ते ४० मुलींना स्टँडवरच उतरवले जाते.
- पूजा पवार, विद्यार्थीनी
आम्ही कसा भेदभाव करू ?
मुलींची बस म्हंटलं की महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थीनी मुलींच्या बसकडे धावतात. शिस्तीसाठी रांगही लावतो मात्र मलकापूरच्या मुली व इतर मुलींमध्ये आम्ही चालक किंवा वाहक कसा भेदभाव करू शकतो. सर्व मुली एकच आम्ही कुणाला मागे सर म्हणणार ? असे त्याठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या एस. टी वाहकाने सांगितले.
कॉलेजवरून सुटताना शिस्तीसाठी मुलींना व मुलांना बसला रांगेतूनच प्रवेश दिला जातो. एस. टी. स्टँड वरही रांगेतच बसमध्ये प्रवेश मिळतो. विद्यार्थी व विद्यार्थीनींची संख्या जास्त असल्यामुळे अनेकवेळा लांबच्यालांब रांगा लागतात. काही वेळा विद्यार्थ्यांचे तासही बुडतात.