मलकापूर नगरपंचायतीकडून कामांना गती
By admin | Published: May 25, 2015 10:52 PM2015-05-25T22:52:55+5:302015-05-26T00:53:44+5:30
प्रशासनाच्या हालचाली : रस्ते, सांडपाणी योजनेच्या कामाची नगरसेवक, अधिकाऱ्यांकडून पाहणी
कऱ्हाड : मलकापूर येथे पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामांसह सांडपाणी योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यावर नगरपंचायतीचा भर आहे. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्व कामांची पाहणी करून पाईपलाईनचे काम लवकर संपविण्याच्या सूचना दिल्या.
आगाशिवनगर भागात सांडपाणी शेतात घुसून नुकसान होत आहे. त्या परिसराची पाहणी करून तेथे सांडपाण्यासाठी पाईपलाईन टाकून कायमचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. कऱ्हाडलगतच्या मलकापूर नगरपंचायतीने सांडपाणी योजनेचे काम हाती घेतले असून, आगाशिवनगर भागात भुयारी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यानंतर मलकापूर भागात हे काम सुरू होणार आहे. आगाशिवनगर भागात सांडपाण्याचा प्रश्न सध्या गंभीर असून, नागरिकांच्या शेतात सांडपाणी घुसत आहे. सांडपाण्यासाठी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना अडचणी येत असल्याने कामाची गती मंदावली होती. पाईपलाईनसाठी कॉलन्यांमधील रस्ते मधोमध उकरून डांबरीकरण करणे सुरू आहे.
डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी नगरपंचायतीने सूचना दिल्या आहेत. बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेवक मोहनराव शिंगाडे यांनी ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग कंपनीपर्यंत सुरू सर्व कामांची पाहणी केली. बालाजी कॉलनी, जयमल्हार कॉलनी, अयोध्या कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, झोपडपट्टी परिसरात त्यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत बांधकाम अभियंता श्रीकांत शिंदे, आत्माराम मोहिते, आरोग्य विभागप्रमुख रामभाऊ शिंदे, यांच्यासह कर्मचारी होते. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा
सांडपाणी योजनेची पाईपलाईन काही शेतकऱ्यांच्या शेतातून न्यावी लागणार आहे. त्या शेतकऱ्यांसह नागरिकांशी यावेळी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आगाशिवनगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांनाही या पथकाने भेटी दिल्या. सध्या शहरात अनेक कामे सुरू आहेत. यामध्ये सांडपाणी योजनेचे काम सर्वात मोठे असून, आगाशिवनगर झोपडपट्टीच्या संरक्षक भिंतीचा निधी मंजूर झाला आहे. ते कामही महत्त्वाकांक्षी आहे