मलकापुरात पोलिसांकडून नियमांचा आवळला फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:09+5:302021-04-03T04:35:09+5:30
मलकापूर : सर्वत्र रात्री आठनंतर संचारबंदी लागू असताना मलकापुरातील रस्त्यावर शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत अनेक जण फिरत असल्याचे ...
मलकापूर :
सर्वत्र रात्री आठनंतर संचारबंदी लागू असताना मलकापुरातील रस्त्यावर शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत अनेक जण फिरत असल्याचे चित्र होते. याचे गांभीर्य ओळखून गुरुवारी रात्री अधिकाऱ्यांसह पोलिसांनी शहरातून सायरन मार्च काढला. या वेळी फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. कोरोना संसर्गाची होणारी वाढ या पार्श्वभूमीवर घरातच थांबण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. या परिस्थितीत घरातच थांबा अन्यथा कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
इतर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासनाकडून अनेक धाडसी निर्णय घेतले जात आहेत.
शासनाच्या सर्व निर्णयांची मलकापुरातही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांसह पालिकेने कंबर कसली आहे. रात्री आठनंतर सर्वत्र संचारबंदीही लागू केली आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावले आहेत. तर सहा पोलीस कर्मचारी दुचाकीवरून व अधिकारी वाहनातून शहरात फिरत गस्त घालत आहेत. असे असतानाही शहरातील शिवछावा चौक, कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता आगाशिवनगर, शिवाजी चौक, मंडई परिसरात नागरिकांचा वाढता राबता दिसत होता. तर अनेक जण विनाकारण घिरट्या घालताना दिसत आहेत. यादरम्यान वेळोवेळच्या तपासणीत अनेक जण रस्त्यावर असेच फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सबळ कारण न सांगितल्यास पोलिसांचा प्रसादही मिळत होता. पर्याय करूनही नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे समोर आले. यापुढील काळ कोरोना संसर्गाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे या काळात नागरिकांनी घरातच थांबणे अत्यंत गरजेचे आहे. हे ओळखून पोलीस प्रशासनाने मलकापूर शहरात कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मलकापूरसह आगाशिवनगरात गुरुवारी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीचे सायरन वाजवत ‘सायरन मार्च’ काढला. या वेळी कोरोना संसर्गाच्या गंभीर स्टेजच्या पार्श्वभूमीवर घरातच थांबण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. शिवछावा चौकासह आगाशिवनगर परिसरात स्पिकरद्वारे कोरोनाच्या या टप्प्यात सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र अचानक सायरन वाजवत पोलीसगाडी आल्यामुळे रस्त्यांवर फिरणाऱ्यांसह काही दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली.
(कोट)
रात्र वैऱ्याची आहे, घरातच थांबा..!
कोरोना संसर्ग ही महामारी आपल्याकडेही फैलावत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. पुढील काळ हा ‘रात्र वैऱ्याची आहे’ असा आहे. याच काळात वेगाने संक्रमण होण्याची भीती जास्त असते. तरी स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या काळजीसाठी घराबाहेर पडू नका.
- बी. आर. पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड
(कोट)
कऱ्हाडच्या प्रमाणात मलकापुरात नागरिकांचा रस्त्यांवरील वावर जास्त आहे. ही बाब गंभीर आहे. याचा विचार करून समाजहितासाठी कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये; अन्यथा पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल. सर्वांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.
- विजय गोडसे,
सहायक पोलीस निरीक्षक
०२मलकापूर
फोटो ओळ : मलकापुरात गुरुवारी रात्री पोलिसांनी सायरन वाजवत गाडी फिरवली. त्या वेळी फिरणाऱ्यांसह दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांची तारांबळ उडाली. (छाया : माणिक डोंगरे)