मलकापूरला अर्थसंकल्पीय सभेत पत्रकारांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:10+5:302021-02-17T04:47:10+5:30
मलकापूर : येथील पालिकेच्या मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेवेळी पत्रकारांना डावलण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभेबाबत पूर्वकल्पना न देता सभेनंतर ...
मलकापूर : येथील पालिकेच्या मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेवेळी पत्रकारांना डावलण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभेबाबत पूर्वकल्पना न देता सभेनंतर केवळ एक पत्रक पाठवून सभेची माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे विरोधी सदस्यांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केला.
मलकापुरातील लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय सभागृहात मंगळवारी झालेल्या या सभेमध्ये पत्रकारांना का बोलावले नाही, असा सवाल करीत विरोधकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना न बोलण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी सभेबाबत दिलेल्या पत्रकानुसार पाच लाख ४६ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांना बोलाविले नव्हते; परंतु सध्या सर्वत्र सर्व कार्यक्रम अतिशय धूमधडाक्यात सुरू आहेत. पालिकेच्या इतर कार्यक्रमांना कोरोनाची भीती राहिली नाही. मग सभेपुरतीच कोरोनाची भीती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक मंगळवारची अर्थसंकल्पीय सभा लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आली होती. त्यामुळे तेथे नगरसेवकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्स ठेवून बसण्यास भरपूर जागा होती. तरीही पत्रकारांना सभेला न बोलाविण्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- चौकट
५९ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचे सत्ताधाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रक दिले आहे. त्या पत्रकानुसार महसुली व भांडवली उत्पन्नातून ५९ कोटी २२ लाख ६९ हजार ८८२ रुपये जमा बाजू व आरंभीची शिल्लक ५ लाख ४५ हजार ९९९ यासह एकूण ५९ कोटी २८ लाख १५ हजार ८८१ रुपये जमा होणार आहेत. त्यातून महसुली व भांडवली खर्चासाठी ५९ कोटी २२ लाख ३९ हजार ८८२ रुपये खर्च अपेक्षित धरला असून, पाच लाख ७५ हजार ९९९ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले आहे.