मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 05:21 PM2022-04-23T17:21:46+5:302022-04-23T17:22:14+5:30
कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मलकापूर : आगाशिवनगर येथील सांडपाणी प्रक्रिया योजनेजवळच्या कचरा डेपोला आग लागल्याने हवेत धुराचे लोट पसरले होते. या धुराने शास्त्रीनगरसह लाहोटीनगर परिसराचा श्वास गुदमरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मलकापूर पालिकेकडून शहरातील सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करत आधुनिक पध्दतीने खतनिर्मिती केली जाते. पालिकेचे खतनिर्मितीसाठी महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूला असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी एक प्रकल्प महामार्गाच्या पश्चिम बाजूला सांडपाणी प्रक्रिया योजनेलगतच आहे. खतनिर्मिती प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या कचऱ्याशिवाय राहिलेला व टाकाऊ कचरा सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या बाजूलाच टाकला जातो. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. या साचलेल्या कचऱ्याला शुक्रवारी रात्री अचानकपणे आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आकाशात पसरले.
दरम्यान, पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे वारे वाहू लागल्याने या कचरा डेपोतून निघणारे धुराचे लोट शास्त्रीनगर, लाहोटीनगरसह महामार्गाच्या बाजूला पसरले. रात्रीची वेळ असल्यामुळे नेमका धूर कुणीकडून येतोय हे लक्षात आले नाही. शनिवारी सकाळी पाहिले असता पालिकेच्या कचरा डेपोला आग लागून त्यातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.