मलकापूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:55+5:302021-06-24T04:26:55+5:30
मलकापूर : मलकापूर पालिकेने कोरोनामुक्तीसाठी मास्टर प्लान तयार केला आहे. या अंतर्गत पालिकेसह काले प्राथमिक आरोग्य केंद्राने कोयना औद्योगिक ...
मलकापूर : मलकापूर पालिकेने कोरोनामुक्तीसाठी मास्टर प्लान तयार केला आहे. या अंतर्गत पालिकेसह काले प्राथमिक आरोग्य केंद्राने कोयना औद्योगिक वसाहतीत व्यावसायिकांसह कामगार मिळून १०० जणांची चाचणी केली. तसेच दुकानदारांसाठी लावलेल्या तीन शिबिरांच्या माध्यमातून ३५९ जणांची चाचणी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी कोणीही बाधित आढळले नाहीत. त्यामुळे मलकापूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.
मलकापूर पालिकेच्यावतीने कोरोनामुक्त मलकापूरसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी दिवसभर पालिकेचे कर्मचारी तळ ठोकून असतात. मात्र, गेल्या १० दिवसात काले प्राथमिक आरोग्य केंद्रासह पालिकेच्या पथकाने शहरात जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी प्रभागनिहाय ९ ठिकाणी रॅपिड चाचणी शिबिरे लावली होती. पोलीस संरक्षणात प्रभागनिहाय ९ ठिकाणी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांसह ९६२ नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या ५५ जणांना पालिकेच्या रूग्णवाहिकेतून पार्ले येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापुढे जाऊन पालिकेतर्फे कोरोनामुक्त मलकापूरसाठी दुकानदारांची सरसकट तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी येथील शिवछावा चौकात १७८ व हायरिस्कमधील ७ नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी केवळ एकजण बाधित आढळला. तर दुसऱ्या दिवशी आगाशिव नगर येथील जिल्हा परिषद कॉलनी परिसरातील ८० दुकानदार व हायरिस्कमधील २१ संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तर बुधवारी कोयना औद्योगिक वसाहतीमधील सर्वच व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे अशा १०० जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोणीही बाधित आढळले नाहीत.
मलकापूर शहरात आत्तापर्यंत केवळ दुकानदार व व्यावसायिकांसाठी ३ ठिकाणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ३५९ दुकानदारांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. या शिबिरामध्ये कोयना औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष जयसिंग सांडगे, सचिव नितीन सांडगे, संचालक उदय थोरात, संचालक खोत, गुणवंतराव जाधव, तलाठी निकम, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाथरवट व सचिन हुमने, नगर परिषद कर्मचारी ज्ञानदेव साळुंखे, रमेश बागल, रामभाऊ शिंदे, बाजीराव येडगे, अंकुश गावडे, सुभाष बागल, पंकज बागल, प्रसाद बुधे, शशिकांत राजे, सुनील शिंदे, पांडुरंग बोरगे, अमृत येडगेंसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कोट
मलकापुरात कोरोना चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह पालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मलकापूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
- जयसिंग सांडगे, अध्यक्ष, कोयना औद्योगिक वसाहत
....................................................................
चौकट :
१२ शिबिरांचा लेखाजोखा. एकूण तपासणी व कंसातील आकडा बाधित...
- खांडोबा नगर २६२ (१६ ), मलकपूर फाटा ८८ (५), अहिल्या नगर
५६ (१५), यशवंत नगर १४४ (५), यादव आर्केड ३९ (३), लक्ष्मी नगर
७५ (०), हौसाई कन्याशाळा १२९ (९), मलकापूर गावठाण १६९ (२), शिवछावा चौक १८५ (१), झेडपी कॉलनी १०१ (५), कोयना औद्योगिक वसाहत १०० (०).
......................................................................
फोटो दि.२३ मलकापूर टेस्ट फोटो...
फोटो ओळ : मलकापूर येथे कोयना औद्योगिक वसाहतीत व्यावसायिक व कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली. (छाया : माणिक डोंगरे)
............................................................