मलकापूरची सांडपाणी प्रक्रिया योजना १२ कोटींनी अडचणीत
By admin | Published: September 22, 2015 09:54 PM2015-09-22T21:54:48+5:302015-09-22T23:30:48+5:30
केंद्राच्या निर्णयाचा फटका : ‘अमृत’ योजनेत सहभागी करण्याचा ठराव
कऱ्हाड : नगरपंचायतीच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत केंद्र सरकारने २०१२ नंतर मंजूर निधीबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे ३५ टक्के काम पूर्ण झालेला येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प १२ कोटी निधीने अडचणीत आला आहे. एकतर केंद्राने मंजूर ३२ कोटी निधी द्यावा, अन्यथा राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेत मलकापूरचा समावेश करावा, या महत्त्वपूर्ण ठरावाबरोबरच महामार्गाच्या सहापदरीकरण करण्याच्या वेळी मलकापुरात
दोन ठिकाणी उड्डाणपुलाच्या
निर्मितीचे ठराव एकमताने करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. सभेचे विषयवाचन मनोहर शिंदे यांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. दुपारी दोन वाजता नगरपंचायत सभागृहात सभेस प्रारंभ झाला. विषयपत्रिकेवरील १९ व ऐनवेळचे २ अशा २१ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय क्रमांक १६ हा चर्चेस घेण्यात आला. मलकापुरातील अत्याधुनिक असा ४० कोटी ९१ लाखांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केंद्र शासन ३२ कोटी ७३ लाख, राज्यशासन ४ कोटी ९ लाख तर नगरपंचायत ४ कोटी ९ लाख अशी या योजनेच्या मंजूर निधीची वाटणी होती. केंद्र शासनाने २०१२ अगोदर व नंतर मंजूर झालेल्या योजनांसाठी नव्याने निधी देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. तसे पत्रही नगरपंचायतीला आले आहे. ते पत्र सभागृहात वाचून केंद्र शासन ३२ कोटी ७३ लाखांऐवजी २० कोटी ७३ लाख निधी देणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे ३५ टक्के
काम पूर्ण झालेली योजना १२
कोटीने अडचणीत येणार असल्याचे शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सर्व नगरसेवकांनी यावर पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित केला. केंद्राच्या सूचनेनुसार हा १२ कोटींचा निधी राज्याच्या अमृत योजनेतून उपलब्ध करावा, अशी सूचना केली असल्याचे अभियंता बागडे यांनी सांगितले. मात्र, अमृत योजनेत १ लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे मलकापूरचा त्यात समावेश होत नाही. म्हणून सभागृहात एकतर केंद्राने मंजूर केलेला पूर्ण निधी द्यावा, अन्यथा मलकापूरचा ‘अमृत’मध्ये समावेश करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने करण्यात आला.
या योजनेचा टप्पा क्रमांक एक हा डिसेंबर १५ अखेर सुरू करण्याचा ठरावही यावेळी केला. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणावेळी मलकापुरात कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर-पुणे लेनवर व नवीन भारती विद्यापीठ गेटसमोर अशा दोन उड्डाणपुलाची निर्मिती करावी, असा ठरावही
केला. यावेळी नगरसेवक राजेंद्र यादव व गजेंद्र बुधावले यांनी मलकापूर फाट्यावर दोन भुयारी मार्गाची
निर्मिती करावी, अशी सूचना
मांडली. (प्रतिनिधी)
आमदारांसोबत स्वतंत्र बैठक
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने २०१४ मध्ये मलकापूरच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेस ४०.९१ कोटी निधीस मंजुरी मिळाली. नवीन निर्णयाने १२ कोटीने अडचणीत आलेली नाविण्यपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा आमदार पृथ्वीराज चव्हाणांसोबत विशेष बैठक घेऊन त्यांच्यामार्फत निधी मिळविण्याचा निर्धारही सभागृहात व्यक्त केला.
सोलरसाठी २ हजारांचे टार्गेट
सोलरसिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६३५ मिळकतदारांनी सोलर वॉटर हिटर बसवले. त्यांची आर्थिक बचतही होत असून दुसऱ्या टप्प्यात २ हजार मिळकतदारांना सोलर उपकरणे देण्याचे टार्गेट नगरसेवकांना देण्यात आले.