..तर गाठ आमच्याशी, शरद पवारांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादीकडून दहिवडीत रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 06:18 PM2023-06-10T18:18:48+5:302023-06-10T18:19:10+5:30
नवनाथ जगदाळे दहिवडी : खासदार शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी ...
नवनाथ जगदाळे
दहिवडी : खासदार शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागला, तर गाठ आमच्याशी आहे,’ असा इशारा देण्यात आला. या धमकीमुळे राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते संतापले असून, राजकारण तापले आहे.
माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहापासून फलटण चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
श्रीराम पाटील म्हणाले, ‘हे एवढं सोप्पं आहे का? पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार सहन केले जाणार नाहीत.’ प्रशांत वीरकर म्हणाले, ‘या सरकारने जातीयवाद्यांना आवर घातला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल.’
‘आमच्या नेत्यांना दिलेल्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत. दिल्लीमधील आंदोलन असेल, या रेल्वे अपघात. यासारखे विषय दडपण्यासाठी राज्यात कट कारस्थाने रचली जात आहेत, तसेच अनेक वेळा शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करून माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्याचा जो धंदा चालू आहे. तो तत्काळ थांबवा, अन्यथा होणाऱ्या परिणामास समाेरे जाण्याचीही तयारी ठेवा,’ असा इशारा महेश जाधव यांनी दिला.
सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना धमकीच्या निषेधाचे निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, सुभाष नरळे, बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, खटाव तालुका महिलाध्यक्षा डाॅ.प्रियांका मानेंसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.