‘माण’ला प्रथमच मंत्रिपदाचा ‘मान’!

By admin | Published: January 28, 2015 10:45 PM2015-01-28T22:45:40+5:302015-01-29T00:08:48+5:30

महादेव जानकर यांना संधी : विधान परिषदेवर वर्णी; फेब्रुवारीत मंत्रिमंडळ विस्तार होणार !

'Mana' for the first time Mana! | ‘माण’ला प्रथमच मंत्रिपदाचा ‘मान’!

‘माण’ला प्रथमच मंत्रिपदाचा ‘मान’!

Next

सातारा : विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या जागेवर ‘रासप’चे नेते महादेव जानकर आणि ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांमधील किमान जानकर यांना तरी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे निश्चित आहे. त्यामुळे माण मतदार संघातील स्थानिक नेत्याला प्रथमच मंत्रिपदाचा मान मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि ‘रिपाइं’ एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढविली. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर २०१४ मध्ये झाली. जागा वाटपात सेना-भाजपचे जुळून आले नाही. त्यामुळे दोघांनीही सवतासुभा मांडला. त्यानंतर मित्रपक्षातील ‘रासप, रिपाइं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम’ हे भाजपकडे गेले. निवडणुकीत ‘रासप’चा एकच राहुल कुल यांच्या रूपाने (दौंड मतदारसंघ) आमदार निवडून आला. इतरांच्या पदरी काहीच पडले नाही. मंत्रिमंडळ स्थापन करताना भाजपने स्वत:च्या पक्षाच्याच आमदारांना स्थान दिले. त्यानंतर शासन स्थिर ठेवण्यासाठी महिन्यानंतर सेनेला मंत्रिमंडळात सामावून घेतले.
मात्र, विधानसभेला बरोबर असणाऱ्या मित्रपक्षांना सत्तेत वाटा दिलाच नाही. त्यामुळे मित्र पक्षांत रुसवे-फुगवे सुरू होते. सत्तेत घेण्यासाठी त्यांच्याकडून दबावाचे राजकारण सुरू होते. त्यामुळे भाजपला नमते घ्यावे लागले. रासप आणि शिवसंग्रामच्या नेत्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागले. या दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. यामधील जानकर यांची मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर माण मतदारसंघातील स्थानिक नेत्याला प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.
माण मतदारसंघातील स्थानिक आमदाराला आत्तापर्यंत कधीच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. १९५७ मध्ये माण-फलटण-खंडाळा या तालुक्यांचा एकच मतदारसंघ होता. त्यावेळी या मतदारसंघातून दोघेजण निवडून दिले जायाचे. एक जागा राखीव होती. त्यावेळी फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे गणपतराव तपासे हे निवडून गेले. मालोजीराजे हे बांधकाममंत्री झाले. तपासे हे राजकारणात अनेक दिवस होते. ते एका राज्याचे राज्यापालही झाले. त्यानंतर मतदारसंघाची विभागणी होऊन माण विधानसभा मतदारसंघ राखीव झाला.
या मतदारसंघात फलटण तालुक्यातील ३६ गावे जोडण्यात आली होती. २००९ च्या निवडणुकीपर्यंत हा मतदारसंघ राखीव होता. या मतदारसंघातून प्रभावती सोनावणे, विष्णुपंत सोनवणे, धोंडिराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपत अवघडे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले; पण मंत्री होता आले नाही.
राज्यात सध्या महायुतीचे शासन सत्तेत असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणार, हे निश्चित आहे. कारण विधानसभा सदस्यांद्वारे विधानसभेवर निवडून द्यायच्या चार रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये ‘रासप’चे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जानकर हे ‘रासप’चे नेते आहेत. (प्रतिनिधी)

पळसावडेचे जानकर..
पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले असावे. जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे या गावचे आहेत.

जानकर यांची मुदत २०१८ पर्यंत
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेवर निवड झाली आहे. शेलार हे विधानपरिषदेचे उमेदवार होते. शेलार यांच्या जागेवर जानकर यांची निवड झाली आहे. जानकर यांची मुदत २७ जुलै २०१८ पर्यंत असणार आहे. त्यानंतर जानकर यांना विधानपरिषदेवर किंवा विधानसभेवर निवडून यावे लागेल, तरच त्यांचे मंत्रिपद राहील, असे सांगण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षे राजकारणात आहे. ‘रासप’च्या माध्यमातून पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर माण-खटाव तालुक्यांबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. माण-खटावमधील पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-महादेव जानकर, अध्यक्ष ‘रासप’

Web Title: 'Mana' for the first time Mana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.