कोरोनामुक्त गावसाठी व्यवस्थापन समितीने प्रभावी कार्यप्रणाली राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:58+5:302021-05-24T04:37:58+5:30
पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ...
पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने अधिक प्रभावीपणे कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे,’ असे आवाहन महाबळेश्वरचे नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांनी केले.
महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आंब्रळ गावाला तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदारांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, तलाठी नीलेश गीते, ग्रामसेवक वैभव काळे, आरोग्य सेविका, आशा प्रमिला आंब्राळे, सरिता आंब्राळे, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे, मुख्याध्यापिका मोरे, ग्रामपंचायत सदस्य विकास जंगम, भानुदास बिरामने, सारिका आंब्राळे, सरिता आंब्राळे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र आंब्राळे, दिलीप आंब्राळे, संदीप आंब्राळे उपस्थित होते.
तिडके म्हणाले, ‘कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रिय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे या पंचसूत्रीवर आधारित असलेली ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने आंब्रळ गावात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही.’
तौक्ते चक्रीवादळाने लोकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी नायब तहसीलदार यांनी जागेवर केली. तिडके यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सरपंच माधुरी आंब्राळे यांनी गावातील तीस कुटुंबांना रेशन मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या पाहून घेऊ, असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिले.