सभेवर जनशक्तीचा ‘बहिष्कार’
By admin | Published: February 24, 2015 10:57 PM2015-02-24T22:57:43+5:302015-02-25T00:01:15+5:30
कऱ्हाड पालिका सभा : सभेतील सर्व विषय ‘एक’मतांनी मंजुर
कऱ्हाड : लोकशाही आघाडी आपल्या बहुमताच्या जोरावर पालिकेचे वार्षिक कामांचे टेंडर मंजूर करून जुन्या ठेकेदारांनाच काम देत आहे. याला आमचा विरोध असल्याचे सांगत सभेवर जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी मंगळवारी बहिष्कार टाकला.
वार्षिक टेंडर मंजुरीसाठी कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळूंखे होत्यासभा सुरू होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर जनशक्ती आघाडीच्यावतीने सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांना वार्षिक कामांचे टेंडरचे विषय ‘एक’मतांनी मंजूर करावे लागले. वार्षिक टेंडर मंजुरीसाठी घेण्यात आलेल्या सभेस लोकशाही आघाडीचे १६ नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकूण ४५ विषय मंजूरीसाठी सभागृहात मांडण्यात आले. या विषयांना नगराध्यक्षांच्या संमतीने एकमतांनी मंजुरी देण्यात आली. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सभेच्या सुरूवातीस जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपाविषयी खुलासा केला. यावेळी सुभाष पाटील म्हणाले, जनशक्तीने केलेल्या मागणीनुसार वार्षिक टेंडर गेली तीन वर्षे ठराविक ठेकेदारांनाच दिले जात आहे. ते नवीन ठेकेदारांना दिले जात नाही. पालिकेत बहूमताच्या जोरावर जुन्या ठेकेदारांना वारंवार टेंडर दिले आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे. स्वत:चे नाक कापून अपशकुन करून घेण्याची प्रवृत्ती विरोधकांमध्ये आहे. या कारणांमुळेच विरोधकांनी आजच्या सभेला अनुपस्थिती लावली. विरोधकांनी समोरासमोर येवून सभागृहात आरोप करावा. त्यावेळी आरोपाला सडेतोड उत्तर देण्याची वृत्ती आमच्यात आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी विरोधकांकडून असा प्रकार केला जात आहे. सभात्याग हे हत्यार अतिशय भयंकर असून बैठक पूर्ण होण्यापूर्वीच सभात्याग करणे चुकीचे असल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.
नगरसेवक जयवंत पाटील यांनी पालिकेतर्फे देण्यात आलेल्या व येणाऱ्या वार्षिक कामांच्या टेंडरविषयी मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहात खुलासा करावा अशी मागणी केली असता पालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या कामांच्या टेंडर विषय सत्यता पडताळणी के ली जाईल अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
जनशक्तीचा लोकशाहीकडूून निषेध
जनशक्ती आघाडीने बालिशपणाने आरोप करत सभात्याग केला. या प्रकाराबाबत लोकशाहीकडून जाहिरपणे निषेध नोंदवत येत असल्याचे लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील यांनी सभागृहात सांगितले.