जनादेश घेताय.. कार्यकर्त्यांची मते कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:31 PM2019-09-17T23:31:18+5:302019-09-17T23:31:22+5:30
दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अलीबाबा आणि चाळीस चोरांची पार्टी आहेत, ...
दीपक शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अलीबाबा आणि चाळीस चोरांची पार्टी आहेत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना आपल्यासोबत घेतले. त्यामुळे पक्षातील मूळ निष्ठावंत बाजूलाच राहिले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने एकाच स्टेजवर असलेल्या भाजपच्या निष्ठावंतांसमोर नव्याने आलेल्या इच्छुकांची उमेदवारी जाहीर करत निष्ठावंतांच्या चेहºयावरील हास्य हिरावून घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रीत फाइली मंजूर केल्या आणि निधीचीही खैरात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोकांचा जनादेश घेत आहे; पण हा जनादेश सभेला आलेल्या लोकांचा घेऊन उपयोग नाही. पूरग्रस्त शेतकºयाला सरकारकडून काय मिळाले, ज्याचे घर पावसात मोडले आणि शेती वाहून गेली, त्याचे काय चालले आहे? अशा पद्धतीने झाला असता तर तो वास्तववादी झाला असता. ज्या महामार्गावरून मुख्यमंत्री आले, त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला; पण मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर एका दिवसात खड्डे मुजविण्यात आले. हे पूर्वी झाले असते तर अनेकांचे प्राण तरी वाचले असते.
मुख्यमंत्र्यांनी जनादेश घेतला; पण पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दीपक पवारांना दोन्ही बाजूला घेऊन महाजनादेश यात्रेची फेरी काढली; पण जनादेश शिवेंद्रसिंहराजेंच्या पारड्यात टाकला. त्याच्या आदल्या दिवशीच आमदारांना पाडणार, अशी घोषणा करणारे दीपक पवार हतबल होऊन महाजनादेशाचा हा सोहळा पाहत राहिले. सातारा-जावळी मतदारसंघातील हा प्रश्न आहे. त्याबरोबरच माण-खटावमध्येही दिलीप येळगावकर, अनिल देसाई हे भाजपशी निष्ठावंत असून, त्यांचा नवख्या उमेदवाराला असलेला विरोध विचारात घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांचा जनादेश घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरात काय चालले आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
कºहाड उत्तर मतदारसंघात मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यामध्ये मोठी चुरस आहे. याठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनोज घोरपडेंची उमेदवारी जाहीर केली; पण धैर्यशील कदम यांनीही जोर लावल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा कल धैर्यशील कदम यांच्याकडेच असल्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा मनोज घोरपडे अडचणीत येतात का? असा प्रश्न आहे. एवढेच नाही तर ही उमेदवारी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्यामुळे त्यांनाही शह देण्याचा मुख्यमंत्री आणि इतर नव्याने पक्षात आलेल्या लोकांचा प्रयत्न असू शकतो.
वाई मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी त्याठिकाणीही भाजपने मदन भोसले यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. याबाबत शिवसेनेला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐनवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातही लढत होऊ शकते. तसे झाले तर आत्मविश्वासाने साताºयाला भाजपचा बालेकिल्ला करणाºया नेत्यांना शह बसल्याशिवाय राहणार नाही.
फलटण मतदारसंघातील प्रश्न तर अनुत्तरितच आहे. दिगंबर आगवणे आणि कुमार शिंदे हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी तयारीला लागले आहेत. दोघांनीही जोरदार तयारी केल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे रामराजे नाईक-निंबाळकर वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मूळचा हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्यामुळे तिथे काय होणार? हेदेखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच रामराजेंनी कोणत्या पक्षात जायचे का राष्ट्रवादीतच राहायचे? हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
अंतर्गत धुसफूस भविष्यात बंडाळी...
जिल्ह्यातील ही परिस्थिती नक्कीच फूल गुड नाही. अंतर्गत धुसफूस ही पुढील काळात बंडाळीच्या स्वरुपात बाहेर येऊ शकते. आज आयातांची रांग लागलीय; पण उद्या बाहेर पडणाऱ्यांचीही रांग लागेल. होत्याचे नव्हते व्हायला फार दिवस लागत नाहीत. त्यासाठी वेळीच घर सांभाळायला हवे. नाहीतर ना घर का ना घाट का, अशी अवस्था होऊन पुन्हा किल्ल्यावरून रिकाम्या हाताने परतायची वेळ यायला नको.