प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांना दरनिश्चितीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:38+5:302021-05-24T04:37:38+5:30
मलकापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांसाठी दरनिश्चिती केली आहे. कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हे दरपत्रक कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील ...
मलकापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांसाठी दरनिश्चिती केली आहे. कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हे दरपत्रक कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील सर्व रुग्णालयांसह रुग्णवाहिकांमध्ये लावणे बंधनकारक केले आहे. येथील शिवछावा चौकातील रुग्णवाहिकाधारकांना मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांच्या हस्ते दरपत्रकाचे वाटप करण्यात आले.
वाढत्या कोरोनाच्या काळात काही रुग्णवाहिकाधारकांकडून जादा दर आकारणी केल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांना दरनिश्चितीची सक्ती करण्यात आली आहे. नेमके किती किलोमीटरला किती दर घ्यायचा याचे दरपत्रक तयार केले आहे. कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील सुमारे ५० वर रुग्णवाहिका व सर्व रुग्णालये अशा साधारणपणे २५० ठिकाणी हे दरपत्रक जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेतून दरपत्रक चिकटवण्यासाठी स्टिकरचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, संतोष काटकर, चालक शरद मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी येथील शिवछावा चौकात असलेल्या रूग्णवाहिकाधारकांसह मलकापूर शहरातील मुख्य रुग्णालयात नागरिकांच्या माहितीसाठी दरपत्रक स्टिकरचे वाटप करण्यात आले. रुग्णवाहिकाधारकांना ही स्टिकर रुग्णवाहिकेत चिकटवणे बंधनकारक असल्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या.
चौकट
कऱ्हाड-पाटण तालुक्यात २५० ठिकाणी लावण्याचे उद्दिष्ट
रुग्णवाहिकांच्या दरनिश्चितीची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यांतील ५० वर रुग्णवाहिकांसह सर्व रुग्णालये अशा २५० ठिकाणी दरपत्रक माहितीचे स्टिकर चिकटवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक संतोष काटकर यांनी यावेळी दिली.
कोट
रुग्णवाहिकांना ठराविक अंतरासाठी ठराविक दर निश्चित केले आहेत. तसे दरपत्रक प्रत्येक रुग्णालयासह रुग्णवाहिकेतून लावले आहे. तरीही ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दराची कोणी आकारणी केल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
-
ऋषिकेश कोराणे, मोटार वाहन निरीक्षक
फोटो ओळी : २३मलकापूर
शिवछावा चौकातील रुग्णवाहिकाधारकांना मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांच्या हस्ते दरपत्रकाचे वाटप करण्यात आले. (छाया : माणिक डोंगरे)