बाधितांना माणदेशी फाऊंडेशन आर्थिक मदत करणार : प्रभात सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:21+5:302021-05-13T04:39:21+5:30
म्हसवड : सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात माणदेशी फाऊंडेशनने कोरोनाबाधित महिला व १८ वर्षाखालील रुग्णांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला ...
म्हसवड : सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात माणदेशी फाऊंडेशनने कोरोनाबाधित महिला व १८ वर्षाखालील रुग्णांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माणदेशी चॅपियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सिन्हा म्हणाले, ‘कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेत माणदेशी फाऊंडेशनने आरोग्य यंत्रणेसोबत मिळून मोठे योगदान दिले होते व हे कार्य अद्यापही अखंडपणे सुरू असून, यापुढेही जोमाने सुरू ठेवले जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत विशेषतः महिला व मुलांमध्ये बाधितांची संख्या अधिक आढळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या कोविड संक्रमणामध्ये कोविड रुग्णांची स्कोर वाढीची समस्याही मोठ्या प्रमाणात निदर्शनाला आलेली आहे.
नक्की हीच गोष्ट लक्षात घेऊन माणदेशी फाऊंडेशनतर्फे कोरोनाबाधित महिलांना व १८ वर्षाखालील रुग्णांना एचआरसीटीसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय माणदेशी फाऊंडेशनने घेतला आहे. एचआरसीटी चाचणी ही प्रत्येक रुग्णाला करणे अनिवार्य असल्याने शिवाय ही सर्वसामान्यांना ब्रेक द चेन लॉकडाऊन कालावधीत आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबाना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांच्या संकल्पनेतून कोरोना पॉझिटिव्ह महिलांना व १८ वर्षाखालील रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्यावर्षापासून कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्य़ातील उपचार करून घरी सोडल्यानंतर ऑक्सिजनची कमी भासू नये, य़ासाठी विनामूल्य ऑक्सिजन मशीन येत्या पाच ते सहा दिवसांसाठी देण्याची योजना सुरू करण्यात येत आहे.
माणदेशी फाऊंडेशनच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ माणदेशी महिला व १८ वर्षाखालील युवकांनी घ्यावा, असे आवाहन प्रभात सिन्हा यांनी केले आहे.