माणदेशी आंबा निघाला दुबईला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:28+5:302021-04-11T04:37:28+5:30

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे ...

Mandeshi mango goes to Dubai ... | माणदेशी आंबा निघाला दुबईला...

माणदेशी आंबा निघाला दुबईला...

Next

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सोसावे लागले आहेत. निसर्गाची कायम अवकृपा अशी परिस्थिती असतानादेखील म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक या शेतकऱ्याने खडकातून चक्क सोनं पिकवलं आहे. त्यांनी लावलेल्या आंब्याला थेट सातासमुद्रापलीकडून मागणी होऊ लागल्याने त्यांच्या शेतात पिकलेला आंबा आता थेट दुबईला निघाला आहे.

म्हसवड परिसरातील खडकी हे छोटेसे गाव. या गावाच्या हद्दीत म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक यांची ४ एकर माळरान जमीन, ही जमीन पाहिल्यावर या जमिनीत कुसळेसुद्धा नीट उगवणार नाहीत, अशी नाबर जमीन. मात्र, अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर या कुटुंबाने कृषी विभागाच्या साह्याने आंब्याची बाग फुलवली आहे. नुसती फुलवलेलीच नाही तर त्या बागेतील आंब्याला आता चक्क दुबईतून मागणी होऊ लागली आहे.

गत १० वर्षांपासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या कुटुंबाने या बागेचे संगोपन केल्याचे हे फळ असल्याचे वेदपाठक कुटुंबीय सांगतात. या कुटुंबाने जेव्हा या बागेसाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना जमीन पाहून अनेकांनी अक्षरश: वेड्यात काढले. मात्र, वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे वेदपाठक कुटुंबाने अपार मेहनतीच्या जोरावर ही किमया घडवली. त्यांच्या आंब्याची छाटणी होताच तो निर्यातीसाठी मुंबईला रवाना करण्यात आला आहे. प्रतिकिलो १५० रुपये हा दर सध्या त्यांना मिळणार असल्याचे या कुटुंबाने सांगितले. या बागेचे संगोपन करताना वेदपाठक कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून अनेकदा ही बाग वाचवण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी या बागेला दिले ‌आहे. शेतातच त्यांनी कृषी विभागाच्या साह्याने ३४ बाय ३४ चे शेततळे उभारून त्यातील पाण्यावर या बागेचे संगोपन केले आहे. आज वेदपाठक यांच्या या आंब्याच्या शेतात जवळपास ४०० हून अधिक झाडे असून प्रत्येक झाडाला ७० ते ८० आंबे लागलेले आहेत. आंब्याचा दर्जा हा उच्च असल्यानेच त्यांनी हा आंबा परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी दुबईसारख्या श्रीमंत देशात वेदपाठक यांच्या शेतातील आंब्याला मागणी होऊ लागली आहे. त्यांच्या या आंब्याची चव सातासमुद्रापलीकडे चाखली जाणार असल्याने वेदपाठक कुटुंबीय सध्या खूश आहे.

खरेतर, माणच्या मातीत सोनं उगवण्याची क्षमता आहे. पण, ते उगवण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. माणदेशी शेतकऱ्यांच्या अंगात एवढी धमक आहे की, तो कमी क्षेत्रात व कमी पाण्यावरही उत्तम शेती करून चांगले उत्पन्न घेतो आहे. यापूर्वीही येथील शेतकऱ्यांना अनेकदा निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे. कधी दुष्काळ, अवकाळी, कधी वादळी तर कधी अतिवृष्टी अशा विविध परिस्थितीचा सामना करीत येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सोने पिकवून दाखवले आहे.

कोट

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार बाग व्यवस्थापन करून निर्यातक्षम आंबा पीक घेतले आहे. विद्यापीठाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांनी तंतोतंत पीक व फळबाग लागवड केली तर निश्चितच यश मिळेल.

हरिभाऊ वेदपाठक, शेतकरी म्हसवड

फोटो ओळी - वेदपाठक यांच्या शेतात पिकलेला आंबा.

Web Title: Mandeshi mango goes to Dubai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.