मंद्रुळकोळेत चक्क पूलच गेला वाहून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:29+5:302021-07-25T04:32:29+5:30
ढेबेवाडी विभागात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. विभागातील वांग-मराठवाडी, महिंद धरण भरले आहे. विभागातील सर्व पूल पाण्याखाली गेले ...
ढेबेवाडी विभागात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. विभागातील वांग-मराठवाडी, महिंद धरण भरले आहे. विभागातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते. पुराचा फटका नदीवरील पुलांना बसला आहे. दोन दिवस पूल पाण्याखाली असल्यामुळे मंद्रुळकोळेतील पूल खचून गेला आहे. तर पुरात वाहून आलेली झाडेझुडपे पुलावरच अडकली आहेत. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे मंद्रुळकोळे खुर्दमधील कुंभारवाडा, यादववाडी, कदमवाडी, साबळेवाडी, धुळेवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
याठिकाणी नवीन नवीन पूल व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार चार वर्षांपूर्वी पुलासाठी ८० लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले होते; मात्र, पुलाचे काम अद्याप रखडले आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने आणि पुराच्या पाण्यामुळे येथील पूल पूर्णपणे खचला आहे. परिणामी, वाहतूक बंद झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून नवीन पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
- चौकट
दोन स्मशानभूमी गेल्या वाहून
मंद्रुळकोळेत पुलाची एक बाजू पूर्ण तुटली आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करून काहीही उपयोग होणार नाही. वांग नदीकाठावर दोन्ही बाजूला असणाऱ्या दोन स्मशानभूमी पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. तसेच मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, सागाव या गावांच्या पाणी पुरवठा विहिरी पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे.
फोटो : २४केआरडी०४
कॅप्शन : मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील वांग नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)