माणचे किंगमेकर, जनसामान्यांचे तात्या हरपले!
By admin | Published: September 30, 2015 10:21 PM2015-09-30T22:21:38+5:302015-10-01T00:30:00+5:30
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर : सदाशिवराव पोळ यांच्या निधनामुळे माण तालुक्यावर शोककळा
म्हसवड : माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या निधनाने संपूर्ण माण तालुक्यावर शोककळा पसरली. माणचे किंगमेकर गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील एक पर्व संपल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. माणच्या राजकारणावर सदाशिवराव पोळ यांनी ५० वर्षे अधिराज्य गाजविले. ते ‘तात्या’ म्हणूनच माणच्या राजकारणात प्रसिद्ध होते. त्यांनी वडिलांच्या निधनानंतर १९६७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून माणच्या राजकारणात प्रवेश केला. १९६७ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी ते माण पंचायत समितीचे सभापती झाले. १७ वर्षे त्यांनी सभापतिपद भूषविले. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी १९७२ ते २००२ पर्यंत ३० वर्षे काम पाहिले. १९९७-९८ मध्ये ते जिल्हा परिषदेचे परिषदेचे उपाध्यक्ष होते. २००२ ते २००८ पर्यंत ते विधान परिषदेचे आमदारही होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सलग ४५ वर्षे संचालक होते. तर २०११ मध्ये त्यांना बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. दिवंगत आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून सदाशिवराव पोळ यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. तर पार्वतीबाई पोळ सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले. जिल्हा दूध संघ, जिल्हा खरेदीविक्री संघ, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदीविक्री संघ, माण तालुका खादी ग्रामोद्योग अशा संस्था उभ्या करण्यासाठी योगदान दिले. राष्ट्रवादीचे पाळेमुळे रोवण्यासाठीही त्यांनी योगदान दिले. (प्रतिनिधी)
सदाशिवराव पोळ यांच्या निधनाने एक सेवाभावी कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. माण तालुक्याचे गेले चाळीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या तात्यांनी अनेकांना विधिमंडळात प्रतिनिधी बनण्याची संधी दिली. विधान परिषदेवर आमदार होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. माणचा विकास हेच स्वप्न बाळगून अविरत धडपडणारा नेता आज माण तालुक्याने गमावला आहे. सामाजिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान माणवासीयांच्या मनात कायम राहील. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.
- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम
शरद पवारांशी ठरली शेवटची भेट
राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यातून वेळ काढून सदाशिवराव पोळ यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी अत्यवस्थ असलेल्या पोळ यांच्या डोळ्यांतून अश्रू आले होते. पवारांशी त्यांची ही अखेरची भेट ठरली.
सहकार, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आदी क्षेत्रांतील जाणकार, सदाशिवराव पोळ यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. विविध संस्थांच्या माध्यमातून माण तालुक्यात त्यांनी उभारलेले कार्य नव्या कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायी आहे. जिल्हा परिषद आणि बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी हितासाठी योगदान दिले. कार्यमग्न लोकसेवकास मुकलो आहोत.
- रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद