बदलत्या हवामानामुळे आंबा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:33+5:302021-04-09T04:41:33+5:30
कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती ...
कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती मोठी होत आहे. परिणामी आंबा बागायत शेतकरी अडचणीत आला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत आंबा पीक कमी झाल्याने दर गडगडण्याची शक्यता असल्याने सामान्य लोकांना मनसोक्त आंब्याची चव चाखता येणार नाही.
काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी आंब्याच्या एका झाडाला दोन ते तीन टप्प्यात मोहर आल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा परिणामी दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात आलेले आंबे ढगाळ वातावरणामुळे गळून पडू लागले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर जळून गेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोर फुल बहरात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे कोणती औषधे फवारण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
कुसूरसह संपूर्ण वांग खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा पिकाची मोठी लागवड केली आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे. नोकरीची वानवा असल्याने अनेक तरुणांनी तुटपुंज्या पाण्याचे योग्य नियोजन करून आंबा झाडांची लागवड केली आहे. वार्षिक पीक असलेल्या या पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने अनेक तरुणांनी पारंपरिक पिके बाजूला ठेवून इस्त्रायल पद्धतीने आंबा लागवड केली आहे. यामध्ये केशर या जातीच्या वाणाला या परिसरातील वातावरण पोषक असल्याने उत्पन्न प्रती वर्षी चांगल्याप्रकारे येत आहे. तर काही शेतकऱ्यांनी हापूस वाणाला पसंती दिली आहे. मात्र, या झाडांना येथील वातावरण योग्य नसल्याने एक आड वर्षाने झाडाला फळ धारणा होत आहे. परिणामी या शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. तर वातावरणातील बदलाचाही फटका बसला आहे.
चौकट :-
झाडांना आंबे लवकर लागावेत, दर चांगला मिळावा म्हणून काही शेतकऱ्यांकडून शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या कल्टार या रासायनिक औषधाचा झाडांना वापर केला जात होता. मात्र, या औषधामुळे अनैसर्गिक पद्धतीने झाडांना मोहोर लवकर येऊन आंबेही लवकर आणि भरपूर प्रमाणात येतात. मात्र, या औषधामुळे झाडांचे आयुष्य कमी होऊ लागले आहे. तर हे आंबे खाणे शरीरला घातक असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
चौकट -:
सेंद्रिय पिकांना वाढती मागणी आणि चांगला भाव मिळू लागल्याने आंब्यांचे पीकही सेंद्रिय पद्धतीने घेणाऱ्या बागायती शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. मात्र, सेंद्रिय आंब्यांना विक्रीसाठी योग्य मार्गदर्शन आणि मार्केट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीमध्ये आंबे विकावे लागत असल्याने सेंद्रिय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या कृषी विभागाकडून याची योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
चौकट-:
रासायनिक शेती ही शरीरासाठी घातक झाली आहे. जास्त उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी रासायनिक खताचा भरपूर वापर करीत आहेत. मात्र, हेच रसायन अन्नातून आपल्या मुलांना देऊन कमजोर करून आजाराला बळी पडण्याचे काम करीत आहेत. हे शेतकऱ्यांना दिसून येत नाही. मात्र, काही शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती केली जात आहे. तसेच फळ बागायतीही माझ्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने शेतकरी जीव ओतून करीत आहेत. प्रत्येक पीक हे सेंद्रिय पद्धतीनेच घेणे काळाची गरज आहे.