‘आम’ आदमीपासून आंबा दूरच!
By Admin | Published: May 3, 2016 09:12 PM2016-05-03T21:12:55+5:302016-05-04T01:09:11+5:30
साताऱ्याच्या बाजारपेठेत दाखल : फळांच्या राजाची आवक वाढली तरीही ग्राहकांची पाठ
सातारा : साताऱ्याच्या बाजारपेठेत फळांच्या राजाचे यापूर्वीच आगमन झाले आहे. बाजारात आंब्याची आवक वाढली असली तरी त्याचे दर तीनशे ते सहाशे रुपये डझन असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. हा आंबा अक्षय्यतृतीयेपर्यंत आवाक्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोकण, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला येथून आंब्यांची आवक झाली आहे. हापूस, पायरी, लालबाग, केशर जातीच्या आंब्यांची आवक वाढली आहे. साधारणपणे तीनशे ते सहाशे रुपये दराने विक्री सुरू आहे. हा दर सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे याकडे सामान्य ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेक भागांमध्ये अक्षय्यतृतीयेनंतरच आंबा खाल्ला जातो. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यानंतरच ग्राहक आंबे खरेदी करत असतात. अक्षय्यतृतीयेनंतर गुजरात, कर्नाटक, सिंधुदुर्ग, राजगड, महाड येथून आवक होणार आहे. गावठी केशर, राजापुरी, हापूस, पायरी जातीचे आंबेही दाखल होऊ शकतात. त्यामुळे दर कमी येणार आहे. (प्रतिनिधी)
खरेदी दरात विक्री... -बाजारात आलेले आंबे विकले जात नसल्याने ते फार दिवस ठेवल्यास खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही विक्रेते खरेदीच्या दरात आंबे विकत आहेत.
- शाहनूर बागवान, फळविक्रेता
सातारा शहरातील बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली असली तरी ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.