सांडपाण्यावरील परसबागेतील आमराई मोहराने फुलली, मान्याचीवाडी ग्रामस्थांचा अनोखा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:14 PM2022-03-01T16:14:57+5:302022-03-01T16:15:17+5:30
रवींद्र माने ढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले ...
रवींद्र माने
ढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले आहे. गावातील सांडपाण्यावर लावलेल्या परसबागांमध्ये लागवड केलेल्या आंब्याच्या बागा मोहराने फुलल्या आहेत. यावर्षी आंब्याचे विक्रमी उत्पन्न मिळेल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू लागल्याने मान्याचीवाडी येथील काही शेतकऱ्यांनी बांधावर तर काहींनी शेतात फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याचा निर्धार केला.
त्यानुसार आंबा, चिक्कू, शेवगा, लिंबू, साग, फणस आदी फळझाडांची निवड केली. त्यासाठी गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटाराच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीची निवड केली. त्यामध्ये ही वृक्षलागवड केली. घरातील आंघोळीचे, धुण्या-भांड्याचे बंदिस्त गटारांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी थेट या झाडांना न देता गटारमध्ये स्क्रिनिंग चेंबर घेऊन शुद्ध पाणी बागेतील फळझाडांना दिले.
गावातील सांडपाणी कुठेही ओढ्याला अथवा नदीला न सोडता त्याचा पुनर्वापर करत येथील शेतकऱ्यांनी परसबागा फुलवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडलीच शिवाय सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासही मदत झाली. सांडपाण्यावर आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेल्या येथील आंबा, चिक्कू आणि लिंबू या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे येथील शेतकरी सांगतात.
यावर्षी चिक्कूही मोठा भाव खाऊन गेला, तर येणारा आंबा हंगाम भरभराट करून जाईल, असा अंदाज असून, सांडपाण्यावर तयार केलेल्या परसबागा मोहराने फुलल्या आहेत.
विजेशिवाय वृक्ष जतन
गावातील सांडपाणी बंदिस्त गटाराद्वारे दोन ठिकाणी वाहून जाते. त्याच मार्गावर या फळबागांचे नियोजन केले आहे. तेथे शेतकरी आपापल्या बागांना आळीपाळीने पाणी देतात. त्यामुळे विजेशिवाय वृक्षलागवडीचा यशस्वी प्रयोग मान्याचीवाडीत यशस्वी झाला आहे.
माझी वसुंधरा अभियानातही वृक्षलागवड...
ग्रामस्थांनी दिवंगतांच्या स्मरणात तसेच महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण तसेच नवदाम्पत्यांनी नवीन संसाराची सुरुवात वृक्षारोपणाने करावी, असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले आहेत. यावर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गतही बांधावरची वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
सांडपाणी हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याची विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण होऊन साथीच्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी प्रत्येक गावाने सांडपाण्याचे नियोजन तसेच त्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था करायला हवी. सांडपाण्याचा पुनर्वापर केला तर उत्पन्नही मिळू शकते. - दिलीप गुंजाळकर, माजी उपसरपंच, मान्याचीवाडी.