सातारा बाजार समितीचा जाहीरनामा; भ्रष्ट कारभाराचा पंचनामा, ‘स्वाभिमानी’चा इशारा
By नितीन काळेल | Published: April 27, 2023 12:42 PM2023-04-27T12:42:31+5:302023-04-27T12:42:57+5:30
शेतकऱ्यांचे भविष्य बंडलबाजांनी उध्दवस्त केले
सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीरनामा प्रसिध्द करुन सत्ताधाऱ्यांचा कारभार उघडा केला आहे. आता मागील ३० वर्षांच्या कामाचा पंचनामा करु. कारण, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठीच ही एकजूट झाली आहे, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे अजिंक्यतारा पॅनेल आणि विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलमध्ये सरळ आणि दुरंगी सामना होत आहे. या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जाहीरनामा प्रसिध्द केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जून सकुंडे, विकास जाधव, माजी नगरसेवक राम हादगे, काँग्रेसच्या सुषमा राजेघोरपडे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले समऱ्थक आणि शेतकरी उपस्थित होते.
जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष शेळके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘बाजार समिती निवडणुकीचा हा जाहीरनामा नसून त्यांच्या ३० वर्षांतील कामाचा पंचनामा मांडला आहे. शेतकऱ्यांचे भविष्य बंडलबाजांनी उध्दवस्त केले. अनेक पापाच्या भानगडी केल्या आहेत.
अजिंक्यतारा साखर कारखान्याने खासगी संस्थेला पाच एकर जमीन दिली. कारण, त्यांना जाब विचारणारेच कोण नाही. त्यामुळे तेही उत्तर द्यायला बांधील नाहीत. सत्ताधाऱ्यांनी काही भ्रष्ट केले असेल त्याची आता पै न पै वसूल केली जाईल. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठीच एकजूट झाली आहे. कारण, दडपशाहीचे राजकारण संपले असून आता उठाव आणि क्रांती झाली आहे.