माणिकराव सोनवलकरांचा राजीनामा

By admin | Published: January 14, 2016 11:49 PM2016-01-14T23:49:23+5:302016-01-15T00:01:46+5:30

पक्षाकडे दिले पत्र : जिल्हा परिषदेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या पदमुक्तीकडे लक्ष

Manikrao Sonawalkar resigns | माणिकराव सोनवलकरांचा राजीनामा

माणिकराव सोनवलकरांचा राजीनामा

Next

सातारा : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा पक्षांतर्गत असला तरी पदमुक्तीसाठी त्यांना विभागीय आयुक्तांकडे रीतसर राजीनामा सादर करावा लागणार आहे, त्यानंतरच तो ग्राह्य धरला जाईल.
‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतरच सर्व घडामोडी घडल्या. जिल्हाध्यक्ष सुनील माने बुधवारी साताऱ्याबाहेर होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षही आपल्या मतदारसंघातल्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे बुधवारी राजीनामा दिला नव्हता.
दरम्यान, ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘राष्ट्रवादी नेत्यांच्या आदेशाला पदाधिकाऱ्यांचा कोलदांडा!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर हे राजीनामापत्र घेऊन गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. मात्र, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील कामानिमित्त कऱ्हाड येथे गेले होते. दुपारी साडेतीन वाजता पाटील राष्ट्रवादी भवनात परतल्यानंतर सोनवलकर यांनी राजकुमार पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांमधील इच्छुकांच्या आकांक्षांना अधिकच पंख फुटल्याचे चित्र आता पुढे आले आहे. ज्यांना याआधी पदे मिळाली आहेत, तेच पुन्हा नव्याने इच्छुकांच्या रांगेत उभे असल्याने राजकीय कोंडी होऊन बसली आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असल्याने याठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन बेरजेचे राजकारण करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू असतानाच स्थानिक पातळीवर मात्र पदांचा खो-खो सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या धोरणानुसार सव्वा वर्षासाठी पद मिळाले होते. याची मुदत संपली असल्याने माणिकराव सोनवलकरांनी पुढाकार घेत राजीनामा सादर केला. इतर पदाधिकाऱ्यांनी मात्र राजीनामा दिलेला नाही. तो केव्हा देतात, याच्याकडे जिल्ह्यातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

दोन नेत्यांभोवती पिंगा...!
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे समर्थक असणारे माणिकराव सोनवलकर सध्या अध्यक्षपदावर आहेत, तर खासदार उदयनराजे भोसले गटाचे समर्थक रवी साळुंखे हे उपाध्यक्ष आहेत. रामराजे व उदयनराजे या दोन नेत्यांच्या भोवतीच सध्या जिल्हा परिषदेचे राजकारण पिंगा घालताना पाहायला मिळत आहे.

Web Title: Manikrao Sonawalkar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.