मनीषा काळेंनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, वडूजच्या नगरसेवकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:47 PM2022-12-08T18:47:30+5:302022-12-08T18:47:48+5:30

नगराध्यक्षपदाचा कालावधी संपण्याची चाहुल लागताच काळे यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी

Manisha Kale should resign from the post of mayor and switch parties, Demand of the corporators of Vaduj | मनीषा काळेंनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, वडूजच्या नगरसेवकांची मागणी

मनीषा काळेंनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, वडूजच्या नगरसेवकांची मागणी

Next

वडूज : येथील नगराध्यक्षा मनीषा काळे यांनी सर्वप्रथम नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, अशी मागणी वडूज विकास आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे. नगराध्यक्षपदाचा कालावधी संपण्याची चाहुल लागताच काळे यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली आहे.

वडूज विकास आघाडीच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे संख्या बलाबल करत दहा महिन्यांपूर्वी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन केली. निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५, भाजपचे ६, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी १, अपक्ष ४ असे नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी, वंचित आघाडी व अपक्षांनी एकत्र येऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमोर वडूज विकास आघाडीची अधिकृत नोंदणीही केली होती. 

नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मनीषा काळे यांना अपक्ष असूनही पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशही केला होता. त्यांच्या पदाचा दहा महिन्याचा कालावधी संपण्याची चाहूल लागताच त्यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला राजकीय भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र बदलती भूमिका घेताना मनीषा काळे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अन् कोणत्याही पक्षात जावे असे या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेविका आरती काळे, राधिका गोडसे, शोभा बडेकर, शोभा वायदंडे, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे आदींच्या सह्या आहेत.

सत्ता स्थापनेपासून भरीव विकासकामात अडथळा निर्माण करणे, पाणी योजनेला खीळ घालणे, टेंडर काढू न देणे, खासदार-आमदारांनी सुचविलेल्या कामांचे ठराव करून घ्यायचे नाही, ही नगर विकास आघाडीची जाचक भूमिका शहराच्या सर्वांगीण विकासाला आड येत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. - मनीषा काळे, नगराध्यक्षा वडूज

Web Title: Manisha Kale should resign from the post of mayor and switch parties, Demand of the corporators of Vaduj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.