अध्यक्षपदाच्या स्पर्धेला मनोमिलनाची किनार
By admin | Published: June 28, 2015 10:29 PM2015-06-28T22:29:06+5:302015-06-29T00:28:52+5:30
प्राथमिक शिक्षक बँक : पाटील गटाकडून कदम; थोरात यांच्याकडून राजेंद्र घोरपडे, बळवंत पाटील यांची नावे चर्चेत
दत्तात्रय पवार -कुडाळ -माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघ आणि संभाजीराव थोरात प्रणित संघ यांच्यात शिक्षक बँक निवडणुकीत समितीला रोखण्यासाठी ऐतिहासिक मनोमिलन झाले. तसेच सत्ता मिळविण्यासाठी शिवाजीराव पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे पाटील गट प्रथम अध्यक्षपदाचा दावा करीत आहे. संचालकांमधून अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे मनोमिलन झालेल्या संघातून शिक्षक बँकेचा अध्यक्ष कोण होणार ? याची चर्चा रंगू लागली आहे. पाटील गटाकडून तुकाराम कदम, तर थोरात गटातून राजेंद्र घोरपडे, बळवंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांच्या आग्रहास्तव शिवाजीराव पाटील यांनी थोरात गटाशी मनोमिलन करीत नऊ जागा लढविल्या. तर थोरात गटाने बारा जागा लढविल्या. निवडणुकीत दोन्ही संघांनी १७ जागांवर विजय मिळविला. थोरात गटातील काही मंडळींकडून निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी पाटील यांनी शिंगणापूर येथे शपथ घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला होता. तरीदेखील कऱ्हाड-पाटण मतदारसंघातील प्रदीप घाडगे यांचा संघातीलच मंडळींनी पराभव केला. ही गोष्ट शिवाजीराव पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पाटील यांच्या रणनितीमुळे बँकेत संभाजीराव थोरात यांची सत्ता आली हे देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळेच पाटील हे अध्यक्षपदावर ठाम आहेत.
मनोमिलनानुसार प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अडीच वर्षे अध्यक्षपद पाटील गटाकडे तर अडीच वर्षे संभाजीराव थोरात गटाकडे राहील असा फॉर्म्युला अवलंबला जाईल असे शिवाजीराव पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यानुसार फलटण तालुक्यातील तरडगाव गटातून विजयी झालेले व संघाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांचे नाव पाटील गटाकडून आघाडीवर आहे. कदम हेच या स्पर्धेत सध्यातरी असल्याचे दिसून येत आहे.
संभाजीराव थोरात गटातून दोन प्रवाह समोर येत आहेत. त्यापैकी एक गट हा राजेंद्र घोरपडे यांच्यासाठी तर दुसरा गट हा बळवंत पाटील यांच्यासाठी आग्रही आहे. त्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक अध्यक्षपादाची निवडणूक पुढील महिन्यात दि. ५ जुलैला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर शिक्षक संघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच गरम झालेले पाहायला मिळत आहे.
यावेळी प्रथमच संचालकांमधून अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे संचालकांचा भाव वाढलेला दिसून येत आहे. अध्यक्षपदी कोण बाजी मारणार याकडेच जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
कदम, घोरपडेंची प्रतिष्ठा
गत निवडणुकीत राजेंद्र घोरपडे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र पराभवामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न मागे पडले. त्यामुळे त्यांची अध्यक्ष होण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. तर पाटील गटाचे तुकाराम कदम हे देखील मागील निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यामुळे यावेळी राजेंद्र घोरपडे, तुकाराम कदम यांची अध्यक्षपदासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बँकेत संघाची एकजूट राहावी...
मनोमिलन सत्तेसाठी झाले आणि बँकेत संघाने सत्ताही मिळविली. परंतु जिल्हा शिक्षक संघात आपलाच शब्दप्रमाण मानला जावा अशा मंडळींची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यातून अध्यक्षपदासाठी छुप्या पद्धतीने लॉबिंग सुरू आहे. अध्यक्षपदासाठी कसलाही घोडेबाजार होऊ नये, बँकेत संघाची एकजूट राहावी तसेच मनोमिलन कायम टिकविण्यासाठी संघाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांनीच लक्ष घालून संघ एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.