निवडणुकीच्या मुहूर्ताला मनोमिनलाची तुतारी..आत्ताच का अट्टाहास : गोंधळ झाला... राडा उसळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:32 AM2019-01-08T00:32:13+5:302019-01-08T00:33:51+5:30

सागर गुजर । सातारा : छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ...

Manmillin's Tutari .... It's a quandary of confusion ... Rada said ... | निवडणुकीच्या मुहूर्ताला मनोमिनलाची तुतारी..आत्ताच का अट्टाहास : गोंधळ झाला... राडा उसळला...

निवडणुकीच्या मुहूर्ताला मनोमिनलाची तुतारी..आत्ताच का अट्टाहास : गोंधळ झाला... राडा उसळला...

Next
ठळक मुद्देआता पुन्हा एकत्र येण्यासाठी भैरवी, राजकीय हित डोळ््यासमोर ठेवून निर्णयसातारा शहराच्या राजकारणावर राजघराण्याचे पूर्वीपासूनच वर्चस्व आहे.

सागर गुजर ।
सातारा : छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनीही पुन्हा एकमेकांत मनोमिलन घडवून आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. राजेंचे मनोमिलन व्हावे, ही समस्त सातारकरांची जुनीच इच्छा. त्या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी दोन्ही राजेंनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत मनोमिलनाची तुतारी फुंकायला सुरुवात केली आहे.

दोन्ही राजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद सर्वश्रूत आहे. आता हा वाद मिटविण्याची उपरती दोघांनाही झाल्याची खुसखुशीत चर्चा सातारा शहरात सुरू आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीआधी हा वाद मिटवून खासदारकी अन् आमदारकी ‘सेफ’ करण्याचे राजकीय हित समोर ठेवून या हालचाली सुरू झाल्याची चर्चाही संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. मनोमिलन पुन्हा झाले तर ‘छत्रपतींच्या घराण्याची गरिमा टिकून राहील,’ असा संदर्भ राजेंकडून दिला जात आहे. दोन्ही राजे त्याबाबत बोलताना एकमेकांकडे मनोमिलनाचा चेंडू टोलवत आहेत. ‘पहले आप... पहले आप,’ म्हणत सुरू झालेला हा नवा गेम पेन्शनर सातारकरांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

‘भले बुरे ते घडून गेले...जरा विसावू या वळणावर....’ या गाण्याची आठवण करत दोन्ही राजेंनी भैरवी आळवायला सुरुवात केली आहे. आता या भैरवीमुळे काहींच्या मनात उकळ्या फुटत आहेत तर काहींचे चेहरे उदास झाले आहेत. सातारा शहरासह विधानसभा मतदारसंघात राजेंचे दोन गट कार्यरत आहेत. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांशी कट्टर आहेत. नेत्यांविरोधातील शब्द ऐकून घेण्याचीही त्यांची मानसिकता नसते. यासाठी टोकाची भूमिका घ्यायलाही कोणी मागे पुढे पाहत नाही. टोलनाका कंत्राट बदलण्यावरून झालेले प्रकरण पुढे किती टोकाला पोहोचले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानासमोर झालेल्या राड्यानंतर दोन्ही गटांच्या सामान्य कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागली. अनेकांना दिवाळीचा सणही कुटुंबीयांसह साजरा करता आला नव्हता. आता या जुन्या गोष्टी पुन्हा उगाळत कशाला बसायच्या, कारण दोन नेत्यांत पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सातारा शहराच्या राजकारणावर राजघराण्याचे पूर्वीपासूनच वर्चस्व आहे. या वर्चस्वाला छेद देण्याचे प्रयत्न तिसऱ्या गटाकडून झाले; तेव्हा दोन्ही राजेंना मनोमिलन करून शहरावरील आपली पकड मजबूत करावी लागली. डाव्या विचारांच्या मंडळींनीही आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले. उदयनराजेंच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी या दोन आघाड्यांनी विरोधकांना नामोहरम केले.

मनोमिलनाच्या काळात गलितगात्र विरोधकांनी आघाडी उघडण्याचा प्रयत्नही मागील निवडणुकीत केला नव्हता. ऐन नगरपालिका निवडणुकीत दोन्ही आघाड्यांची युती तुटली. ऐतिहासिक मनोमिलनालाही तडा गेला. त्यानंतर शहरात उदयनराजेंची अन् तालुक्यात शिवेंद्रसिंहराजेंची सत्ता असे चित्र तयार झाले. दोघांची हीच ताकद एकमेकांना पूरक कशी ठरविता येईल. यासाठीच दोन्ही पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.दोन्ही राजे पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास सातारकरांना होता आणि अजूनही आहे. निवडणुकीपुरते राजकारण होते आणि पुन्हा सबकुछ आलबेल असाच सूर पाहायला मिळतो.

दोघांच्या अडचणी सारख्याच
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सातारा शहरातूनच कमी मतदान झाले होते. आता शहरात सत्ता नसल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लोकसभेला सातारा व जावळी भागाच्या ग्रामीण भागातून उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी मदत करायची अन् विधानसभेला शहरातील मताधिक्क्य उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या पारड्यात टाकायचे, असा अलिखित करार या निमित्ताने होऊ शकतो.


उदयनराजेंची जिल्ह्यात बांधणी; शिवेंद्रराजेंचीही तयारी
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी खासदार उदयनराजेंची निती आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात जोरदार बांधणी केली. त्यामुळे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविली तरी अडचण येणार नाही, असा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मात्र सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात अधिक प्रयत्न करावे लागतील. विकासकामांच्या जोरावर त्यांनी चांगली बांधणी केली आहे; पण फक्त विकासकामे हाच निवडून देण्याचा पर्याय राहिला असता तर अनेक विकासाभिमुख नेत्यांचा पराभव झाला नसता. त्यामुळे सर्व प्रकारची ताकद त्यांना लावावी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवून जिंकायची असेल तर दोन्ही राजेंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: Manmillin's Tutari .... It's a quandary of confusion ... Rada said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.