साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरू
By नितीन काळेल | Published: August 10, 2024 09:23 PM2024-08-10T21:23:16+5:302024-08-10T21:23:29+5:30
डिहायड्रेशनचा त्रास : रक्तदाब अन् ईसीजी नाॅर्मल; डाॅक्टरांची माहिती.
लोकमत न्यूज नेटवर्क , सातारा : साताऱ्यात आल्यानंतर मराठा समाज आरक्षण आंदाेलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांच्यावर मुक्कामी हाॅटलेमध्येच तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत. डिहायड्रेशनचा त्रास होत असून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. तसेच त्यांचा रक्तदाब आणि ईसीजीही नाॅर्मल असल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.
सातारा शहरात शनिवारी मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची शांतता रॅली होती. यासाठी शनिवारी दुपारी ते सातारा शहरात आले होते. रॅलीनंतर सभेच्या ठिकाणी त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर संयोजकांनी शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांशी संपर्क साधला. मुक्कामी असणाऱ्या हाॅटेलमध्येच डाॅक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यावेळी त्यांचा रक्तदाब आणि ईसीजी नाॅर्मल असल्याचे दिसून आले. पण, त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. त्यामुळे सलाईन लावण्यात आली आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या काळजीसाठी डाॅक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे संयोजकांनी सांगितले.