साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जल्लोषी स्वागत; क्रेनने घातला हार
By नितीन काळेल | Published: November 18, 2023 02:30 PM2023-11-18T14:30:36+5:302023-11-18T14:31:19+5:30
सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत, आयोजकांकडून विश्वास व्यक्त
सातारा : मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा दाैरा सुरू असून शनिवारी साताऱ्यातील सभेपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करत क्रेनद्वारे मोठा हार घालण्यात आला. तर याभेटीदरम्यान, आयोजकांनी आरक्षणासाठी सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते. त्यावेळी राज्य शासनाने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दाैरा सुरू केला आहे.
शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. तसेच सातारचे दोन्ही राजे आरक्षणाबाबत आपल्यासोबत असल्याचेही सांगितले. यावेळी समाजबांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी... एक मराठा, लाख मराठा.. अशी जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळ भेटीनंतर मनोज जरांगे-पाटील हे पोवई नाक्यावर गेले. याठिकाणी समाजबांधवांनी फुलांच्या वर्षावात जरांगे-पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर ते सभास्थळाकडे रवाना झाले.