..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

By प्रमोद सुकरे | Published: November 18, 2023 05:14 PM2023-11-18T17:14:42+5:302023-11-18T17:27:24+5:30

भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं

Manoj Jarange Patil warned the Maratha leaders | ..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

कराड : मराठा आरक्षणाचा प्रश्न ७० टक्के मार्गी लागला आहे. ३० टक्के बाकी आहे. अशावेळी आज आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी पाठीशी उभे राहा. नाही राहिलात तर ही लेकरं आयुष्यभर तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत', असा खणखणीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी कराडात सर्वपक्षीय मराठा नेत्यांना जाहीर सभेतून दिला. 

जरांगे-पाटील म्हणाले, आज मराठ्यांच्या लेकरांवर वेळ आली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा. मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही, पण पाठीशी राहिला नाहीत तर हाच मराठा आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही. दरम्यान ग्रामीण भागातील मराठा आणि ओबीसी समाज आजही एकमेकांच्या सुख-दुःखात उभा राहतो. मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जायचं नाही. कुणी कितीही उचकवलं तरी उचकू नका, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना केले.

भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं

छगन भुजबळ यांचा समाचार घेताना जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ म्हणून व्यक्तीला आपला विरोध नाही. त्यांच्या विचारांना विरोध आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे त्यांना किंमत द्यायची नाही. त्यांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलंय हे लक्षात घ्या. मराठा आरक्षणाच्या विरोधातील त्यांचे सगळे डाव हाणून पाडा.

सध्या जशास तसं उत्तर नाही

राज्यात, जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात साखळी उपोषण सुरू नाही, असं एकही गाव राहिलं नाही पाहिजे. ७० वर्ष न मिळालेलं आरक्षण आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करून निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. हे शांततेच ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद देशात कोणातच नाही. त्यामुळे सध्या जशास तसं उत्तर द्यायचं नाही. त्यांना जरा दमू द्या. काय-काय करतात बघा, असा सल्लाही जरांगे-पाटील यांनी दिला.

Web Title: Manoj Jarange Patil warned the Maratha leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.