ग्रामपंचायत निवडणूक : मनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:51 PM2021-01-13T18:51:38+5:302021-01-13T18:53:06+5:30
gram panchayat Election Satara- कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येवून निवडणूक लढत आहे. तर घारेवाडीत उंडाळकर गट विरूध्द चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परिणामी, काही समर्थकांना उंडाळकर-चव्हाण मनोमिलन रुचलेले दिसत नाही.
गणेश काटेकर
कुसूर : कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येवून निवडणूक लढत आहे. तर घारेवाडीत उंडाळकर गट विरूध्द चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परिणामी, काही समर्थकांना उंडाळकर-चव्हाण मनोमिलन रुचलेले दिसत नाही.
पोतले ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता असली तरी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी सत्ता बदल केल्याचा इतिहास आहे. उंडाळकर गट विरूद्ध चव्हाण गट लढत अटीतटीची दिसून येत होती. मात्र नऊ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत उंडाळकर गट आणि चव्हाण गट एकत्रीत आले असून त्यांची विरोधी संमिश्र गटाशी लढत होत आहे. दोन पॅनेल असल्याने दुरंगी लढत होत आहे.
घारेवाडी ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता होती. उंडाळकर-चव्हाण यांचे मनोमिलन झाले असले तरी गावपातळीवर हे मनोमीलन रूचल्याचे दिसून येत नाही. नऊ सदस्य निवडीसाठी घारेवाडीत तीन पॅनेलमध्ये लढत होत आहे. दोन वॉर्डसाठी तीन पॅनेल तर एका वॉर्डसाठी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. उंडाळकर गट, चव्हाण गट आणि भोसले गट अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून चोवीस उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.
फलकावर मनोमिलनाचे वारे
घारेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट व पृथ्वीराज चव्हाण गटाने स्वतंत्र पॅनेल टाकून समोरासमोर लढतीसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, दोन्ही पॅनेलच्या फलकावर उदयसिंह पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो असल्याचे दिसून येत आहे. फलकावर मनोमीलन दिसत असले तरी दोन्ही गटाचे पैलवान एकमेकाविरोधात आखाड्यात नशीब अजमावू लागले आहेत .