मनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:31 AM2021-01-14T04:31:59+5:302021-01-14T04:31:59+5:30
कुसूर : कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येऊन निवडणूक ...
कुसूर : कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत, तर घारेवाडीत उंडाळकर गट विरुद्ध चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परिणामी, काही समर्थकांना उंडाळकर-चव्हाण यांचे मनोमिलन रुचलेले दिसत नाही.
पोतले ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता असली तरी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताबदल केल्याचा इतिहास आहे. उंडाळकर गट विरुद्ध चव्हाण गट लढत अटीतटीची दिसून येत होती. मात्र, नऊ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत उंडाळकर गट आणि चव्हाण गट एकत्रित आले असून, त्यांची विरोधी संमिश्र गटाशी लढत होत आहे. दोन पॅनल असल्याने सरळ लढत होत आहे.
घारेवाडी ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता होती. उंडाळकर-चव्हाण यांचे मनोमिलन झाले असले तरी गावपातळीवर हे मनोमिलन रुचल्याचे दिसून येत नाही. नऊ सदस्य निवडीसाठी घारेवाडीत तीन पॅनलमध्ये लढत होत आहे. दोन वॉर्डांसाठी तीन पॅनल तर एका वॉर्डासाठी दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. उंडाळकर गट, चव्हाण गट आणि भोसले गट अशी तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून, चोवीस उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
- चौकट
फलकावर मनोमिलनाचे वारे
घारेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट व पृथ्वीराज चव्हाण गटाने स्वतंत्र पॅनल टाकून समोरासमोर लढतीसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, दोन्ही पॅनलच्या फलकावर उदयसिंह पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो असल्याचे दिसून येत आहे. फलकावर मनोमिलन दिसत असले तरी दोन्ही गटाचे पैलवान एकमेकांविरोधात आखाड्यात नशीब अजमावू लागले आहेत.