प्रस्थापितांविरोधात ‘मनोधैर्य’ एकवटणार !

By admin | Published: February 13, 2015 09:58 PM2015-02-13T21:58:36+5:302015-02-13T22:57:20+5:30

कार्यकर्त्यांचे नेत्यांनाच साकडे : म्हणे, एकास एकच उमेदवार द्या

'Manpower' will be organized against the establishment! | प्रस्थापितांविरोधात ‘मनोधैर्य’ एकवटणार !

प्रस्थापितांविरोधात ‘मनोधैर्य’ एकवटणार !

Next

प्रमोद सुकरे- कऱ्हाड-- विधानसभा निवडणुकीत मतविभाजनाचाच प्रस्थापितांना फायदा झाला. तो फायदा कारखाना निवडणुकीत प्रस्थापितांना होऊ नये म्हणून आता विरोधी कार्यकर्त्यांनीच एक पाऊल पुढे-मागे घ्यायचा पवित्रा घेतलाय. एकास एक उमेदवार देण्याचा आग्रह आपापल्या नेत्याकडे धरलाय. त्यामुळे विधानसभेत विस्कटलेले ‘मनोधैर्य’ सह्याद्रीत एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा बिगुल नुकताच वाजला आहे. १७ मार्च रोजी मतदान होणार आहे. पण अर्ज दाखल करण्याची मुदत १६ फेब्रुवारी असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्यात. कोण कोणता निर्णय घेणार, या निवडणुकीचे नक्की चित्र काय असणार अन् निकाल काय लागणार, याबाबत अंदाज बांधण्यातच सर्वजण व्यस्त आहेत.
यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कऱ्हाड तालुक्यात असला तरी त्याचे कार्यक्षेत्र अन् सभासद पाच तालुक्यांत आहे. कऱ्हाडसह कोरेगाव, सातारा, खटाव अन् कडेगाव या ठिकाणी त्याचे मतदार विखुरलेले आहेत. त्यांची संख्या ३५ हजार ७८७ एवढी आहे. त्यामुळे या पाच तालुक्यांतील राजकीय परिस्थितीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणुकीवर परिणाम होणार हे नक्कीच. फक्त विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा कऱ्हाड ‘उत्तरे’तील सभासद मतदारांशी असणारा थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.
खरंतर विधानसभेची निवडणूक वेगळी अन् कारखान्याची वेगळी; पण बाळासाहेबांनी या दोन्ही निवडणुकींवर पकड ठेवण्याचा प्रयत्न केलाय; म्हणून तर कारखाना दोनवेळा बिनविरोध करण्याचे अन् विधानसभेत विजयाची हॅट्ट्रिक मारण्याचे कसब त्यांनी दाखविले आहे. पण, नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील सभासद शेतकऱ्यांवर त्यांनी आतीव प्रेम केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तर मतदार संघाबाहेरील सभासद शेतकऱ्यांना आपलंसं करीत, आपल्याला मिळालेल्या दुजाभावाचं ‘उत्तर’ देण्याची हीच वेळ आहे; असे विरोधक पटवून देऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे अन् ‘काँग्रेस’चे धैर्यशील कदम हे सध्या बाळासाहेब पाटलांचे मुख्य विरोधक मानले जातात. या दोघांनीही विधानसभे पाठोपाठ सह्याद्रीत उतरण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन दिशाही ठरविण्याचा प्रयत्न केलाय; पण या दोघांच्याही मेळाव्यात कार्यकर्त्यांनीच आता मतविभाजन नको, विधानसभेची चूक पुन्हा नको, असे नेत्यांकडे स्पष्ट मत मांडले अन् एकास एक उमेदवार द्या, असे जणू साकडेच घातले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करीत या नेत्यांनीही परस्परांशी चर्चा करू, असा कार्यकर्त्यांना मेळाव्यात शब्द दिलाय. त्यामुळे प्रस्थापितांविरोधात सह्याद्रीत ‘मनोधैर्य’ एकवटल्यास आश्चर्य वाटायला नको.


शनिवार अन् सोमवारकडे लक्ष
‘सह्याद्री’च्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ३२ इच्छुकांसाठी ४९ अर्जांची विक्री झाली आहे खरी; मात्र शुक्रवार अखेर एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस उरल्याने आता साऱ्यांचे लक्ष शनिवार अन् सोमवारकडे लागले आहे. कोण-कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याची चर्चा मात्र सभासदांमध्ये रंगू लागली आहे.


‘भीम’गर्जनेकडे लक्ष...
‘भीम’गर्जनेकडे लक्ष...
‘सह्याद्री’च्या कार्यक्षेत्रात कोरेगावचे भीमराव पाटील, सातारचे भीमराव घोरपडे अन् कऱ्हाड-खटावच्या सीमेवरील भीमराव डांगे हे तिन्ही स्थानिक नेते येतात. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीबाबत ते काय गर्जना करणार याबाबत सभासदांच्यात उत्सुकता आहे.

Web Title: 'Manpower' will be organized against the establishment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.