माणुसकीची भिंत आता फलटणमध्येही सुरू !

By admin | Published: December 29, 2016 10:23 PM2016-12-29T22:23:46+5:302016-12-29T22:23:46+5:30

नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद : जमा झालेले कपडे ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोचणार; एक ट्रकभर कपडे दान

Manusaki wall now in Phaltan! | माणुसकीची भिंत आता फलटणमध्येही सुरू !

माणुसकीची भिंत आता फलटणमध्येही सुरू !

Next

फलटण : साताऱ्यात सुरू असलेल्या माणुसकीच्या भिंतीला चांगला प्रतिसाद मिळत असून, आता ही ‘माणुसकीची भिंत’ फलटणमध्येही सुरू होत आहे. जमा झालेले कपडे ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत आणि ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत.
‘वात्सल्य’ फाऊंडेशन आणि ‘हैप्पी पीपल’ सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने ‘माणुसकीची भिंत’ हा प्रकल्प दुसऱ्यांदा राबविण्यात आला. या उपक्रमाला सातरकरांनी दातृत्वाचा उच्चांक गाठत जवळजवळ १ ट्रक भरेल एवढे कपडे दान केले. जवळजवळ ४० स्वयंसेवक सकाळपासून त्यावर काम करत होते. जमा झालेले कपडे घेणारे आणि देणारे यांचा गर्दीचा महापूर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. तर काही कार्यकर्ते वाहतूक व्यवस्था पाहत होते. येणाऱ्या कपड्यांचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती ‘वात्सल्य’ फाऊंडेशनचे शशिकांत पवार यांनी दिली. नागरिकांनी कपडे दान केल्यानंतर कपड्यांची वर्गवारी करणे हे मोठे काम स्वयंसेवकांकडून केले गेले. स्वयंसेवक म्हणून शाळकरी मुले पण काम करत होती. इथून पुढे काही कपडे आणि वस्तू दुर्गम भागात आणि ऊसतोड मजूर यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही ‘माणुसकीची भिंत’ मंगळवार, दि. १० जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. अजय गायकवाड यांनी समस्त सातारकरांचे आभार मानले.
दरम्यान, ही ‘माणुसकीची भिंत’ आता फलटणमध्ये सुरू होत आहे. ‘ज्याच्याकडे जास्त आहे त्याने द्यावे’ ही संकल्पना आता घेऊन सातारा डिस्ट्रिक्ट अ‍ॅटोमोबाईल डीलर असोसिएशन, जैन सोशल ग्रुप फलटण, लाइयन क्लब फलटण, व्यापारी संघ तसेच सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारपासून फलटण येथील शासकीय विश्रामगृहासमोर ही ‘माणुसकीची भिंत’ असणार आहे. हा हा म्हणता ही संकल्पना देशभर काही मोजक्या शहरांमध्ये पोहोचली ती आता फलटणमध्येही. काही तरुण आणि वरिष्ठ लोक एकत्र आले. समाजासाठी असलेली सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी असलेले देणं हे यातून साकार होत आहे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्याकडे असलेले कपडे, स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे, चादरी, ब्लँकेट्स, चपला, बुट, लहान मुलांची खेळणी आणि कपडे माणुसकीच्या भिंतीला लटकवावित, असे आवहन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Manusaki wall now in Phaltan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.