अपघात पाहताना अनेक अपघात

By admin | Published: December 28, 2014 10:02 PM2014-12-28T22:02:09+5:302014-12-29T00:04:26+5:30

कऱ्हाडनजीक घटना : सहा वाहने एकमेकावर आदळली; जीप, बस, टँकर, ट्रकसह दोन कारचे नुकसान

Many accidents while watching the accident | अपघात पाहताना अनेक अपघात

अपघात पाहताना अनेक अपघात

Next

कऱ्हाड : अपघात झाल्यानंतर तो कसा झाला, त्यामध्ये कोण-कोण जखमी झाले, नक्की कशाचा अपघात झाला, हे पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. पण मदत कोणीच करत नाही़ अपघात पाहण्याच्या उत्सुकतेपोटी सहा वाहनांचा अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी कऱ्हाडनजीक पाचवड फाटा येथे घडली़
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या लक्झरी बसची आणि ट्रकची पाचवड फाटा येथे रविवारी पहाटे धडक झाली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसानही झाले. अपघातामुळे ट्रक व बस महामार्गाकडेलाच थांबली होती. त्याच वेळी कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो जीपचालकाचा अपघातग्रस्त ट्रक व बस पाहण्याच्या प्रयत्नात जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीप महामार्गावर उलटून जवळून निघालेल्या पांढऱ्या स्विफ्ट कारला धडकली. या धडकेत कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली़, तर कारचे प्रचंड नुकसान झाले.
एकापाठोपाठ घडलेल्या या तीन अपघातांमुळे महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबली. चालकांनी अचानक ब्रेक दाबल्यामुळे पूर्वीच्या अपघातस्थळापासून काही अंतरावर एकामागे एक वाहने थांबली. दरम्यान, त्याच वेळी ‘काय झालं’ हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाऱ्या टँकरची स्विफ्टला जोरात धडक बसली़ या धडकेमध्ये स्विफ्ट कार दोन फुटापर्यंत उचलून रस्त्याकडेला जाऊन उपमार्गावर उलटली. त्यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)


पोलिसांत नोंदच नाही
अपघात गंभीर असेल तर त्याची नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद होते. तसेच त्याचा पोलिसांकडूनही तपासही केला जातो. पाचवड फाटा हे ठिकाण कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, रविवारी पाच वाहनांचा अपघात होऊनही त्याची कसलीच नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नाही. अपघाताबाबत कुणाचीच कुणाविरूद्ध तक्रारही नाही, हे विशेष!

Web Title: Many accidents while watching the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.