जिल्ह्यातील अनेक ‘माळीण’ भयभीतच
By admin | Published: July 30, 2015 12:09 AM2015-07-30T00:09:43+5:302015-07-30T00:31:58+5:30
‘लोकमत’ची पाहणी
सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव कड्याखाली पूर्ण गाडले गेल्याच्या घटनेला गुरुवारी (दि. ३०) वर्ष पूर्ण होत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत माळीणसदृश स्थिती कायम आहे. तेथील गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे आढळून आले असून, बोर्गेवाडी वगळता वर्षभरात प्रशासन ठोस उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहे.डोंगर अरणे, खचणे, मुरुम मोकळा होऊन शिळा सुट्या होणे या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली असलेल्या गावांमध्ये प्रशासन हव्या तेवढ्या वेगाने पोहोचले नसल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील बोर्गेवाडीतील बहुतांश ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, अशा प्रकारे इतर गावांमध्येही लगबगीने हालचाली करण्याची गरज दिसून आली आहे. (लोकमत चमू)
‘लोकमत’ची पाहणी
माळीण दुर्घटना घडली त्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ‘माळीण’ गावे शोधून काढली होती. कड्याच्या खाली किंवा तुटणाऱ्या कड्यांवर राहणाऱ्या या गावांची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे सचित्र दर्शन त्याचवेळी घडविले होते. काही गावांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी भेटीही दिल्या होत्या. ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून काढण्यासाठी ठोस उपाय झाले का, हे पाहण्यासाठी ‘लोकमत चमू’ने यातील काही गावांना भेटी देऊन पाहणी केली.