राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:47 PM2021-07-26T13:47:52+5:302021-07-26T13:47:59+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक साताऱ्यात मदतीसाठी धावून गेले आहेत.
सातारा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२६ जुलै) रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. मात्र सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर ते लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरावं लागलं.
मागील पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीत पाच तालुक्यांतील ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. तर पाटण तालुक्यातील भूस्खलनामधील ५ आणि वाई व जावळी तालुक्यातील पुरात बेपत्ता झालेल्या चौघा नागरिकांचा शोध सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच भागाची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे साताऱ्यात रवाना झाले होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर लँड न झाल्याने त्यांना पुन्हा माघारी फिरावं लागलं. परंतु ''जिथे मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, तिथे मनसे पोहोचली'' , असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक साताऱ्यात मदतीसाठी धावून गेले आहेत. तसेच कोयनानगर येथील दरडी कोसळलेल्या गावांमध्ये भेट देऊन प्रशासनाकडे पाठपुरवठा करण्याचे आश्वासन देखील संदीप देशपांडे गावकऱ्यांना दिले.
तत्पूर्वी, साताऱ्यात धो-धो पाऊस कोसळत होता. आभाळ फाटल्यासारखी सर्वत्र स्थिती होती. गुरुवारी तर कोयना, नवजा येथे विक्रमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना धरणात अवघ्या २४ तासात १६ टीएमसीहून अधिक साठा वाढला होता. या पावसामुळे भूस्खलन होऊन दरडी कोसळल्या. ओढ्यांतील पाण्याने पात्र सोडले. नद्यांना महापूर आला. तसेच अतिवृष्टीमुळे घरेही पडली होती.
भूस्खलनात २६, पुरात ८ जणांचा मृत्यू...
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भूस्खलन, दरड कोसळणे, पुरात वाहून गेलेल्यांचा समावेश आहे. भूस्खलनात सर्वाधिक २६, पुरात ८, दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर एका वृध्दाचा घराचे छत अंगावर पडल्याने बळी गेला आहे.
युध्दपातळीवर काम...
पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध सुरूच आहे. अंदाजे अजूनही ५ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे. तर वाई आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचाही शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.