हनिट्रॅपमधून पुण्यातील अनेकांना गंडा, साताऱ्याच्या 2 महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:20 AM2020-09-28T06:20:28+5:302020-09-28T06:21:06+5:30
लाखो रुपये उकळले; साताऱ्यात दोन्ही महिलांना घेतले ताब्यात
सातारा : शहरातील एका डॉक्टरला हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढणाºया दोन संशयित महिलांना तपासासाठी पुण्याला घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या महिलांनी कोथरूड परिसरामध्येही अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे तपासात समोर येत आहे. फोन करून त्या बड्या व्यक्तींना जाळ््यात ओढायच्या.
प्राची उर्फ श्रद्धा अनिल गायकवाड व पूनम संजय पाटील (दोघीही रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. कोथरूड, पुणे) या दोघींनी साताºयातील एका प्रसिद्ध डॉक्टरला जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल १२ लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले. रविवारी दिवसभर पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये झडती घेतली. त्या वेळी काही कागदपत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. या दोघींच्या चौकशीमध्ये त्यांनी पुण्यामध्येही असे प्रकार केल्याचे पोलिसांना समजल्यानंतर रविवारी सायंकाळी या दोघींना घेऊन पोलीस पुण्याला रवाना झाले.
या दोघींचे कारनामे रविवारी प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना अनेकांचे फोन आले. या महिलांनी कशा प्रकारे लोकांना गंडा घातला आहे, याची माहिती दिली जात होती. मात्र ‘आमचे नाव गोपनीय ठेवा,’ अशी विनंतीही संबंधित लोकांनी पोलिसांकडे केली आहे. अनेकांकडून त्यांनी दहा ते पंधरा लाख रुपये उकळल्याचे बोलले जात आहे.
अनेक बड्या व्यक्तींचे नंबर
या महिलांच्या मोबाइलमध्ये अनेक बड्या हस्तींचे नंबर सेव्ह असून त्यामध्ये सातारा आणि पुण्यातील उद्योजक, महाविद्यालयीन युवक, डॉक्टर अशा लोकांचा समावेश आहे. या नंबरच्या आधारे पोलीस आता संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणार असून, ज्यांना या महिलांनी हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढले त्यांना पोलीस स्वत:हून तक्रार देण्यास प्रवृत्त करणार आहेत.
नणंद-भावजय नव्हे, त्या तर मैत्रिणी
श्रद्धा गायकवाड आणि पूनम पाटील या दोघी नणंद-भावजय आणि जोगतीन असल्याचे सांगत होत्या. मात्र, तपासात त्यांनी आपण नणंद-भावजय व जोगतीन नसून मैत्रिणी आहोत, अशी पोलिसांकडे कबुली दिली. या दोघी मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी या गावातील आहेत. मात्र, गत अनेक वर्षांपासून या दोघी पुणे, सातारा, सोलापूर अशा विविध ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. त्या ठिकाणी सावज हेरून काम फत्ते झाल्यानंतर त्या ते शहर सोडून दुसºया शहरात वास्तव्यास जात होत्या. या दोघीही पतीपासून विभक्त झाल्या आहेत.
१० वर्षांत तक्रारदार आला नाही पुढे
या महिलांनी दहा वर्षांपासून पुणे आणि साताºयामध्ये हनिट्रॅपचे जाळे तयार केले असून, यामध्ये अनेक जण अडकले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. मात्र इतक्या वर्षांत एकही तक्रारदार पुढे आला नाही. त्यामुळे या महिलांचे धारिष्ट्य अधिकच वाढले.