सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:39 PM2022-08-18T16:39:10+5:302022-08-18T16:39:32+5:30

सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित

Many remote villages of Satara district are still deprived of basic services | सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

googlenewsNext

सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. जावळी तालुक्यातील सांडवली-केळवली ग्रामपंचायतअंतर्गत येणारी गणेशवाडी, दत्तवाडीदेखील याला अपवाद नाही. या वाड्यांमध्ये आरोग्य सेवाच उपलब्ध नसल्याने आजारी व्यक्तीला चक्क बांबूच्या कावडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सांडवली-केळवली हे जावळी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले गाव. येथील गणेशवाडी व दत्तवाडीत मिळून ३० कुटुंबे वास्तव्य करतात. सातारा शहरापासून ही वाडी ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या दुर्गम वाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असून, साधा ये-जा करण्यासाठी रस्ताही कधी झाला नाही. वाडीत एखादी महिला, पुरुष अथवा गर्भवती आजारी पडल्यास त्यांना कावडीतून तीन किलोमीटरची पायपीट करून केळवली अथवा सांडवली गावापर्यंत आणलं जातं. येथे दुधाची अथवा मिळेल ती गाडी पकडून वीस किलोमीटर अंतरावर असलेले परळी हे गाव गाठावं लागतं. आजार गंभीर असेल तर रुग्णाला साताऱ्याला हलविण्याशिवाय पर्याय नसतो.

गणेशवाडीतील चिंगूबाई भगवान माने (वय ७०) ही वृद्धा रविवारी आजारी पडल्याने तिला चार गावकऱ्यांनी बांबूची कावड करून कसेबसे रुग्णालयात दाखल केले. दगड-माती, चिखल अन् पावसाच्या धारा झेलत रुग्णच नव्हे तर ग्रामस्थांना देखील अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला आरोग्य सेवेसाठी झगडावे लागत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं, अशा भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

अकरा दिवसांपासून वीज खंडित

मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे गणेशवाडी व दत्तवाडीचा वीजपुरवठा अकरा दिवसांपूर्वी खंडित झाला आहे. ग्रामस्थांनी कल्पना देऊनही वीजवितरणचा कर्मचारी आजवर येथे फिरकला नाही. त्यामुळे नोकरीनिमित्त परगावी असणाऱ्या येथील तरुणांना आई-वडिलांशी, नातेवाइकांशी संपर्कच साधता येत नाही. ना ग्रामस्थांना आपल्या समस्या कोणाला सांगता येत आहेत. प्रशासनाने किमान आमची वीज तरी सुरू करावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तुम्हीच सांगा आम्ही जगाचयं कसं ?

या भागातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दुर्गम डोंगरी भाग असल्याने लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते व प्रशासन ढुंकून देखील पाहत नाही. या भागातील नागरिक आजही पारतंत्र्यातील जीवन जगत आहेत. - तानाजी सकपाळ, दत्तवाडी
 

आमच्या दोन्ही वाड्या आजही विकासापासून वंचित आहे. मुलांना रोज तीन किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागते. या भागात वन्यप्राण्यांकडून सातत्याने हल्ले होतात. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? - रवींद्र जानकर, गणेशवाडी

या भागात आरोग्य सेवा कधीच उपलब्ध होत नाहीत. ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. प्रशासनाला गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही निवेदने देत आहोत; परंतु आमच्या व्यथा कोणीही जाणून घेत नाही. - दत्तराम सकपाळ, दत्तवाडी

Web Title: Many remote villages of Satara district are still deprived of basic services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.