दूषित पाणीपुरवठा झाल्याने अनेकांना जुलाबाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:51+5:302021-05-10T04:39:51+5:30
सणबूर : पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे चार दिवस नदीकाठी असणाऱ्या विहिरीत, बंधाऱ्यात साचलेले व पावसामुळे पुराचे पाणी गेल्याने दूषित ...
सणबूर : पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे चार दिवस नदीकाठी असणाऱ्या विहिरीत, बंधाऱ्यात साचलेले व पावसामुळे पुराचे पाणी गेल्याने दूषित पाणीपुरवठा झाला. हे पाणी प्यायल्यामुळे अनेकांना जुलाबाचा त्रास झाला आहे. सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मालदन येथील बंधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी मागणी कृष्णाखोरे महामंडळाकडे केली आहे; पण दुर्लक्ष होत आहे, असा आरोप सरपंच आत्माराम पाचुपते यांनी केला आहे.
पाचुपते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाचुपतेवाडी (ता. पाटण)ची नळ पाणीपुरवठा योजना ढेबेवाडीजवळील वांग नदीच्या संगमापासून काही अंतरावर वरच्या बाजूस आहे. नदीच्या संगमाच्या खालच्या बाजूला मालदन गावाजवळच बंधारा आहे. बंधाऱ्याची दारे बंद केल्यानंतर पाण्याची फुगी संगम पुलाच्या मागे दूरपर्यंत जात असते. पाचुपतेवाडी नळ पाणीपुरवठा विहिरीदरम्यान ही फुगी येत असते. चार दिवसांपासून दररोज दुपारी जोरदार पाऊस होत असून, यामुळे वांग नदीला पूर येत आहे. पाणी वाहते नसल्याने मृत आहे. या परिस्थितीमुळे बंधाऱ्यातील पाण्याची फुगी वाढून हे पाणी विहिरीत गेले असून, पाचुपतेवाडीला चार दिवस दूषित पाणीपुरवठा झाला आहे. ग्रामस्थांनी हेच दूषित पाणी प्यायल्यामुळे काहींना जुलाबाचा त्रास झाला आहे. बांधाऱ्याची दारे खुली असती तर हे पाणी विहिरीत गेले नसते व याचा त्रास लोकांना झाला नसता. कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी आम्ही मागणी केली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले आहेत. यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.