मायणी पक्षी आश्रयस्थानातील अनेक वृक्ष वटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:32+5:302021-08-02T04:14:32+5:30
मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलावाशेजारी असलेल्या पक्षी आश्रयस्थानातील (राखीव पक्षी संवर्धन क्षेत्र) अनेक जुने पानझडी वृक्ष वटले आहेत. या ...
मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलावाशेजारी असलेल्या पक्षी आश्रयस्थानातील (राखीव पक्षी संवर्धन क्षेत्र) अनेक जुने पानझडी वृक्ष वटले आहेत. या वाटलेल्या वृक्षांच्या जागी नवीन फळझाडे व सदाहरित वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासकांमधून होत आहे.
मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावर मायणीपासून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर मायणी ब्रिटिशकालीन तलाव आहे. या ब्रिटिशकालीन तलावाच्या परिसरामध्ये सुमारे ६५ हेक्टर क्षेत्रावर मायणी पक्षी आश्रयस्थान आहे. या पक्षी आश्रयस्थानाला केंद्राकडून नुकताच राखीव पक्षी संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. तसेच सातारा वन विभागामार्फत या परिसरामध्ये विविध पक्ष्यांचे फोटोग्राफ्स लावून पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, या परिसरामध्ये कित्येक वर्षांपूर्वी वृक्षांचे रोपण केले होते. यामधील बहुतांश वृक्ष व पानझडी वृक्षातील आहेत. यामुळे उन्हाळ्यातील चार ते पाच महिने वृक्ष पूर्ण वटल्यासारखे दिसतात. अनेक वृक्षांवर एकही पान दिसत नाही. वनक्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे, तर अनेक ठिकाणचे जुने वृक्ष वटले आहेत. त्यामुळे जवळपास २० ते ३० टक्के जागा रिकामी आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने या परिसरामध्ये वटलेले वृक्ष काढून त्या ठिकाणी नवीन सदाहरित वृक्ष लावावे तसेच वनक्षेत्रामध्ये जिऊ मरगळ झालेली झाडे व वटलेली झाडे आहेत, अशा ठिकाणी नवीन झाडे लावावीत, या नवीन झाडांचे वृक्षारोपण करताना फळ, फूल तसेच पक्ष्यांसाठी खाद्य उपलब्ध होईल, असे वृक्ष लावावेत, अशी मागणी पक्षीप्रेमी व पक्षी अभ्यासकांकडून होत आहे.
(चौकट...)
देशी-विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार!
गत दोन वर्षांपासून तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा आहे. त्यामुळे तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पक्ष्यांच्या विविध जाती मुक्तसंचार करत आहेत. याठिकाणी पक्ष्यांना खाण्यासाठी सध्या पाण्यातील जीवजंतू, कीटक आहेत. त्यामुळे या ठिकाणी विविध जातींच्या फळझाडांची लागवड झाल्यास पक्ष्यांना फळे खाण्यासाठी उपलब्ध होतील.
चौकट :
वृक्षारोपणासाठी जागेची मागणी...
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत तसेच विविध सामाजिक संस्थांकडूनही अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, या सर्वांना योग्य मार्गदर्शन करून मायणी वन विभाग क्षेत्रामध्ये विविध फळझाडे लागवड (वृक्षारोपण) करण्यासाठी प्रोत्साहन देऊन जागा उपलब्ध करून द्यावी.
०१मायणी
मायणी पक्षी आश्रयस्थानातील अनेक वृक्ष अशा पद्धतीने वटले आहेत. (छाया :संदीप कुंभार)