वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खिळखिळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:42+5:302021-03-01T04:45:42+5:30
वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा ...
वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासूनची परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे.
यामध्ये वेळे-भिलारेवाडी, सुरुर-मोहोडेकरवाडी, सुरुर-वहागाव, कवठे-वाई, उडतरे-कुडाळ आदी मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.
या गावांना जोडणारे मुख्य रस्ते अतिशय खराब झाले असून, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्वी डांबरी असणारे रस्ते मातीमय झाले आहेत. अनेक वर्षांपासून हीच दयनीय अवस्था सहन करीत येथील स्थानिक रस्ता होण्याची नुसती वाटच बघत आहेत. त्यांची ही आशा कधी पूर्ण होणार? ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे प्रत्येक गावांच्या रक्तवाहिन्या होत, परंतु याच रक्तवाहिन्या व्यवस्थित नसतील तर या गावांची दशा अत्यंत बिकट होते. याचा अनुभव येथील रहिवाशांना नक्कीच येत असेल.
यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही रस्ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. वेळे-भिलारेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेला आहे.
वेळे-भिलारेवाडीचा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये मंजूर झाला. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी जानेवारी २०२० मध्ये संपला; मात्र कासवगतीने सुरू असलेले हे काम तीन वर्षे होऊनही पूर्ण होत नाही. या रस्त्यावर साधी खडीही पडलेली नाही, मग डांबरीकरण कधी होईल? गेल्या तीन वर्षांपासून येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना विविध प्रकारच्या आजारांनी सतावले आहे. रस्त्यावरून जाताना गाडीत बसले तरी हाडे खिळखिळी होत आहेत, तर गाडीची अवस्था कशी होईल? त्यामुळे येथील रहिवाशांना शारीरिक, मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. त्याबरोबरच आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे घरांत धुळीचे कण जमा होऊन श्वसनाचे आजार जडत आहेत. तीन वर्षांपूर्वी सध्यापेक्षा कितीतरी चांगला रस्ता होता. या रस्त्याची चाळण झाली आहे. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता वेळेत पूर्ण केला नाही. त्यामुळे लोकांना याचा नाहक फटका बसत आहे. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, कामगार असे अनेकजण प्रवास करीत असतात. त्यातच रात्रपाळी करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना अनेकदा भय वाटते. या रस्त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गाड्या घसरून अपघात देखील झाले आहेत.
कोट
वेळे-भिलारेवाडी हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यास तीन वर्षेही पुरत नसतील तर यापेक्षा दुर्दैव ते काय? मुदत संपून देखील या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- रोहिणी भिलारे, ग्रामपंचायत सदस्या
कोट २
दररोजच्या कामासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे दुचाकीचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकदा गाडी घसरण्याची शक्यता वाढतच आहे. तसेच रस्त्यामुळे वेळही वाढत आहे आणि आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. संबंधित विभागाने हा रस्ता पूर्णत्वास न्यावा.
- गणेश भिलारे, नोकरदार
चौकट :
वाई तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची समस्या ही खूप वर्षांपासून आहे. बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित इतर विभागांनी याकडे विशेष लक्ष देऊनही कामे पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. खराब रस्त्यांमुळे होणारे नुकसान लोकांना आता परवडणारे नाही.
फोटो २८वेळे
सुरुर-मोहोडेकरवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटनांवर वाढ झाली आहे. (छाया : अभिनव पवार)