कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

By दीपक शिंदे | Published: June 28, 2023 02:07 PM2023-06-28T14:07:58+5:302023-06-28T14:09:21+5:30

रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

Many wild vegetables grew in the surrounding hills including the Kas area | कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

googlenewsNext

पेट्री : शहराच्या पश्चिमेस दुर्गम, डोंगराळ भागातील कास परिसरासह आसपासच्या डोंगररांगात निसर्गाने दिलेले सर्वात मोठे, आरोग्यदृष्ट्या उत्तम दान म्हणजे मान्सून सक्रिय होत असताना अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, अनुभवी व्यक्ती रानोरानी दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. या रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

काही थंड तर काही उष्णवर्गीय रानभाज्या परिसरात उपलब्ध होत असतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खातात. याच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोवळी पाने शिजवून कुरडूची भाजी केली जाते. ही भाजी खोकला, कफ कमी करण्यासाठी गुणकारी असते. आळू, भारंगी, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणाऱ्या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळा ऋतूत भाज्यांचे सेवन केल्याने शरीरास आरोग्यदृष्ट्या महत्वाच्या ठरतात.            
 
पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येण्यास सुरुवात होते. रानभाज्या दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. सध्या कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात या रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा समावेश आहारात करतात. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणे म्हणजे फारच दुर्मीळ. जवळच्या बाजारपेठेत देखील ग्रामस्थांकडून या रानभाज्या विक्रीस नेल्या जातात.

कोणत्याही खताविना उगवून आलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणीच असते. चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. परंतु, एकसारख्या दिसणाऱ्या काही वनस्पती विषारीदेखील असू शकतात. म्हणून जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तीच या रानभाज्या शोधून आणतात. या रानभाज्यांची भाजी कशा पद्धतीने करायची याची माहितीदेखील इतरांना देतात.

डोंगरातील निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या आरोग्यास फायदेशीर आहेत. डोंगरातील शेंडवल, भारंगीसारख्या अनेक रानभाज्या आम्ही आवडीने खातो. या रानभाज्या कसलेच कष्ट न करता आपोआप उगवतात. पावसाळ्यातील रानभाज्या निसर्गाचे एक प्रकारे वरदानच आहे.  - कृष्णा आखाडे, कुसुंबीमुरा, ता. जावळ

Web Title: Many wild vegetables grew in the surrounding hills including the Kas area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.