सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:54 PM2022-02-21T12:54:32+5:302022-02-21T13:07:10+5:30
राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत
ढेबेवाडी : श्रमदान आणि लोकसहभागातून ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरलेले पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गाव आता ग्रामीण विकासाचे अभ्यासकेंद्र बनले आहे. राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत.
सांगलीचे सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील चाळीस ग्रामपंचायतींंचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी ढेबेवाडीला भेट दिली.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने पंचायत राज व्यवस्थेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांची भर घालत एका आयडीयल गावाची संकल्पना यशस्वी केली आहे. यामुळे येथे ग्रामीण विकासावर अभ्यास करणारे प्रशिक्षणार्थी, सिंबाॅयोसीसचे विद्यार्थी, यशदा पुणे येथे प्रशिक्षणासाठी असणारे विद्यार्थी, यासह राज्यासह परराज्यातूनही हजारो गावातील गावकारभाऱ्यांनी या गावाची अभ्यासासाठी निवड केली. येथे भेटी देऊन ग्रामविकासाचा अभ्यास केला आहे.
सांगलीचे सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विस्ताराधिकारी श्रीधर कुलकर्णी, विस्ताराधिकारी आर. एल. गुरव, विस्ताराधिकारी एस. डी. मगदूम, विस्ताराधिकारी मदन यादव यांच्यासह सुमारे चाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर आदिंनी मान्याचीवाडीमध्ये येऊन राबविलेल्या उपक्रमांची माहीती घेतली.
यामध्ये सौरग्राम, रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्यावरील परसबागा, बंदिस्त गटर योजना, सीसीटीव्ही, वॉटर सायरन, बायोमेट्रिक ग्रामसभा, वृक्षलागवड, पक्षांची भोजनालये आदिंसह ग्रामपंचायतीच्या कारभाराची पाहणी करुन चर्चा केली. यावेळी सरपंच रवींद्र माने, विस्ताराधिकारी कुंभार, प्रसाद यादव, दादासाहेब माने यांनी माहिती दिली.
ग्रामीण विकासात मान्याचीवाडीसारख्या छोट्याशा गावाने खूपच मोठी झेप घेतली आहे. निश्चितच येथील उपक्रम प्रेरणादायी तसेच ग्रामविकासाला चालना देणारे आहेत. गावागावातील सरपंच आणि गावकारभाऱ्यांसह प्रशासनाने असे उपक्रम राबविल्यास ग्रामविकासाची चळवळ यशस्वी ठरेल. - विशाल नरवाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी मिरज