सातारा जिल्ह्यात मराठा बांधवांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:57 PM2018-11-29T22:57:53+5:302018-11-29T22:58:03+5:30
सातारा : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा, फलटण, म्हसवड, महाबळेश्वर, कºहाड, ...
सातारा : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा, फलटण, म्हसवड, महाबळेश्वर, कºहाड, खंडाळासह ठिकठिकाणी पेढे व साखर वाटून जल्लोष करण्यात आला. आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी,’ अशा घोषणा दिल्या.
म्हसवडमध्ये साखर वाटून जल्लोष
राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय मराठा समाजाने जल्लोष करून म्हसवड येथे आनंद व्यक्त केला. मुंबई येथील राज्य अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडला. त्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, रासप, शेकापसह सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला.
मराठा आरक्षण एकमताने मंजूर होताच म्हसवड येथील सर्व मराठा बांधव एकत्र आले. म्हसवड बसस्थानक व प्रमुख चौकात फटाके वाजवून, साखर वाटून जल्लोषात घोषणा देऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने सर्वांनी श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बाळासाहेब राजेमाने, जय राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, आकाश माने, महादेव माने, डॉ. जयराज पवार, सुरेश काटकर, बापूसाहेब बाबर यांच्यासह सर्व राजकीय पक्षातील अनेक मान्यवर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेणबत्त्या प्रज्वलित करून वाहिली श्रद्धांजली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरील मंत्रिमंडळ समितीचा एटीआर सादर केल्यानंतर गुरुवारी कोणत्याही चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहरी भागासह ग्रामीण भागातही स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विशेषत: शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. कºहाड येथे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले.