‘जागर’साठी मराठा बांधव आज रवाना-साताऱ्यातील बैठकीत पुन्हा एल्गार; तुळजापूरच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून मोठा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:19 PM2018-06-27T22:19:54+5:302018-06-27T22:20:25+5:30
सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाºया जागर व गोंधळ मोर्चासाठी साताºयातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी
सातारा : सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाऱ्या जागर व गोंधळ मोर्चासाठी साताऱ्यातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी जिल्हाभरातूनही मराठा बांधवांचा मोठा सहभाग निश्चित झाला असून, त्या त्या तालुक्याच्या ठिकाणाहून मराठा बांधव मार्गस्थ होणार आहेत.
मुंबईतील ५८ व्या मोर्चानंतरही शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कसलाही प्रतिसाद दिला नाही. इतर समाजाने मोर्चे काढले असते तर सरकारने गुडघे टेकून त्यांना वंदन करून मागण्या मान्य केल्या असत्या. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. शासनाने सुरुवातीच्या काळात फसव्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.
विराट मोर्चानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा व निर्णायक टप्पा लवकरच सुरू होत आहे. त्या अनुषंगाने राज्यभर बैठकांचे सत्र सुरू आहे. साताºयातही मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीला समन्वयक शरद काटकर, हरीष पाटणे, राजू भोसले, राजेंद्र मोहिते, शरद जाधव, वैभव चव्हाण, अमोल मोहिते, बापू क्षीरसागर, संदीप पोळ, सुनील काटकर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साताºयातून गुरुवारी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहावरून मराठा बांधव तुळजापूरकडे रवाना होणार आहेत. यासंदर्भात मराठा बांधवांनी शरद जाधव व प्रशांत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक तालुक्यातून त्या त्या तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलनासाठी जाण्याबाबतचे नियोजन करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
२९ जून रोजी तुळजापूर येथे जागरण व गोंधळ घालून दुसऱ्या टप्प्यातील रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मराठा समाजाच्या मुलांना टक्केवारी चांगली मिळाली; परंतु आर्थिक विवंचनेमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही. ही मराठा समाजाची शोकांतिका आहे. नुकतेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला शिक्षणासाठी शासनाने लाभ दिलेला नाही.आज ८० टक्के मराठा समाज शेतकरी असून, तो ४० एकर जमिनीवरून चार गुंठ्यांवर आला आहे. कारण मराठा या नावामुळे कुठल्याच सवलती त्याला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. शासन फसवत आहे, याची मराठा समाजाला जाणीव होऊ लागली आहे.
बैठकीत १२ ठराव सर्वानुमते मंजूर
साताºयातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकूण १२ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. समाजाच्या यापुढील आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात सर्वांनी सहभागी होऊन आंदोलनाची तीव्रता व व्यापकता वाढवण्याचा एल्गार पुकारण्यात आला. यावेळी झालेल्या ठरावापैकी तीन ठराव खालीलप्रमाणे आहेत. दरम्यान, साताºयात लवकरच मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक होणार असल्याची माहितीही समन्वयक शरद काटकर यांनी दिली.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत २० मार्च २०१८ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी व मराठा क्रांती मोर्चाने गैरवापर रोखण्यासाठी सूचवल्याप्रमाणे कायद्यामध्ये तत्काळ दुरुस्त्या करून त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू कराव्यात.
मराठा आरक्षणाबाबत कोणतीही न्यायालयीन वा प्रशासकीय सबब न दाखवता वा सांगता राज्य शासनाने येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षण जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच केंद्र शासनास मराठा समाजाचा इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्याबाबत ठोस शिफारशीसह तत्काळ अहवाल पाठवावा व राजपत्रित अधिसूचना काढण्याबाबत विनंती करावी.
ईबीसी सवलत आणि पन्नास टक्के फी माफीचा निर्णय तत्काळ लागू करावा व त्या आदेशाची प्रत राज्यातील सर्व कॉलेजेस व शाळांना देऊन या आदेशाचे पालन व अंमलबजावणी न करणाºया शाळा व कॉलेजेसची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागास द्यावेत.