मराठा समाजाची २० जानेवारीला आरक्षण वारी, साताऱ्यातील साखळी उपोषण स्थगित
By दीपक देशमुख | Published: December 26, 2023 06:15 PM2023-12-26T18:15:48+5:302023-12-26T18:16:18+5:30
पश्चिम महाराष्ट्रातून लाखो जण होणार सहभागी
सातारा : आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण तीन चिमुकल्यांच्या हस्ते सरबत घेवून स्थगीत करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव २० जानेवारीला पायी आरक्षण वारी काढणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ६३ दिवसांपासून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जरांगे-पाटील यांची राज्यस्तरीय मराठा क्रांती माेर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. यात झालेल्या निर्णयानुसार २० जानेवारीपर्यंत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २० जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईत मराठा समाज गोळा होईल, असा अल्टिमेटम सरकारला दिला. तथापि, सातारा जिल्ह्यातील साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात आले. परंतु, पोलीस प्रशासनाने २० जानेवारीपर्यंत निर्णय होण्याची प्रतीक्षा करावी व उपोषण सोडावे असे आवाहन केले. ही शिष्टाई सफल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंंगळवारी तीन शाळकरी मुली यांच्या हस्ते सरबत घेवून आणि पोलिस अधिकारी प्रमुख उपस्थितीत उपोषणाची सांगता केली.
यानंतर २० जानेवारीला पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या वतीने आरक्षण वारी काढण्यात येणार आहे. वारीच्या नियोजनाची लवकरच बैठक होणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून मराठा बांधव सातारा जिल्ह्यापर्यंत येतील. यानंतर जिल्ह्यातील मराठा युवक बांधव वारीत सहभागी होतील. वाटेतील सर्व गावातील मराठा बांधवांना सोबत घेवून वारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शरद काटकर यांनी दिली.
आंदोलकांचे पोलिसांकडून कौतुक
पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी म्हणाले, पुढील महिन्यात आंदोलनाबाबत निर्णय होणार असून तोपर्यंत आंदोलन स्थगीत करावे, अशी विनंती मराठा समाजाबांधवांना केली होती. त्यास मान देवून साखळी उपोषण स्थगीत करण्यात आहे. मराठा समाजाने इतक्या दिवसांच्या उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्था होणार नाही, याची काळजी घेतली हे कौतुकास्पद आहे.