गावोगावच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘मराठा आयकॉन’
By admin | Published: September 13, 2016 12:42 AM2016-09-13T00:42:23+5:302016-09-13T00:45:38+5:30
तरुणांचे व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत तसेच मान्यवरांचेही ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन माहिती, नियोजन, बैठका याची माहिती देण्यात येऊ लागली आहे.
सातारा : कोपर्डी घटनेनंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चे लाखोंच्या संख्येने निघू लागले असून, साताऱ्यातील विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता गावोगावी मराठा तरुणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे आयकॉनही झळकू लागले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील क्रांती मोर्चा हा लाखोंच्याच संख्येने निघणार, हे यावरून स्पष्ट होत आहे. उस्मानाबाद, बीड येथील मोर्चा तर महामोर्चा ठरला. आता साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा हा विराट आणि ‘न भूतो न भविष्यति’ असा काढण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे. साताऱ्यात झालेल्या नियोजन बैठकीत मोर्चाची आचारसंहिता, रूपरेषा, तालुकानिहाय बैठका, साताऱ्यातील मोर्चावेळी एकत्र येण्यासाठीचा मार्ग याचे नियोजन झाले आहे. आता साताऱ्यातील हा मोर्चा मोठा व विराट ठरविण्यासाठी मराठा समाज बांधवांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे पाहता साताऱ्यातील नियोजन बैठकीपूर्वीच गावोगावच्या मराठा समाज बांधवांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून मोर्चासाठी जनमत तयार करण्यात येऊ लागले आहे. तरुणांचे व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत तसेच मान्यवरांचेही ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन माहिती, नियोजन, बैठका याची माहिती देण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे गावोगावच्या मराठा समाज बांधवांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आता मोर्चाचा आयकॉन दिसून येऊ लागला आहे. (प्रतिनिधी
मेढ्यात रविवारी; खंडाळ्यात लवकरच बैठक
मेढा/खंडाळा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी यासाठी मेढा येथे रविवार, दि. १८ रोजी दुपारी एक वाजता यशोदिप मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. तसेच खंडाळा येथेही नियोजन सुरू आहे. येत्या आठवड्यात खंडाळा येथे ही बैठक पार पडणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात बैठकीसाठी मेसेज दिले जात आहेत. मोबाईल व्हॉटस्अॅप आणि फेसबुक यांसह सोशल मीडियावरून ‘मराठा क्रांती मोर्चाचे’ मेसेज पाठवले जात आहेत. जिल्ह्याचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी जावळी अन् खंडाळा तालुकाही अग्रेसर राहणार आहे.
तरुणांचा मोठा सहभाग...
साताऱ्यात निघणाऱ्या क्रांती मोर्चासाठी मराठा समाजातील तरुणाई अग्रेसर राहणार, असे दिसून येऊ लागले आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून साताऱ्यातील मोर्चा विराट काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे मोर्चात तरुणांचा मोठा सहभाग राहणार आहे.